सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
फलटण तालुक्यातील कापशी- आळजापूर चौक येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवार, दि.22 मे रोजी दुपारी 1. 30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांच्या सूचनेनुसार कर्मचारी दाखल झाले होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आळजापूर-कापशी येथील बस थांबा असलेल्या मुख्य चौकात ट्रक क्रमांक (NL- 01- AE- 8348) हा ट्रक सातारा बाजूकडे जात असताना शनिवारी मध्यरात्री रस्त्यावर बंद पडला. आज रविवारी दुचाकीवरून शहाजी मल्हारी मिसाळ (वय- 50) हे आपल्या गाडीवरून क्रमांक (MH- 11- CY- 0915) आदर्किकडे जात होते. यावेळी समोरील येणारे वाहन पाहून दुचाकीचा वेग नियंत्रण करत असताना ट्रकवर जोरात आदळल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन दुचाकीस्वार शहाजी मिसाळ हे जागेवरच ठार झाले. शहाजी मिसाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन अविवाहित मुले असा परिवार आहे.
सदरच्या नादुरुस्त ट्रक शनिवारी मध्यरात्रीपासून उभा आहे. दरम्यान पाठीमागे व पुढे याबाबत सूचना देण्यासाठी किंवा तसा दिशादर्शक असा कोणताही फलक नसल्याने ही घटना झाल्याचे बोलले जात आहे.