सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव सध्या भरून वाहू लागला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पालिकेच्या वतीने कास तलावाचा ओटीभरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम व पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांच्या हस्ते ओटीभरण करण्यात आले.
सातारा पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या ओटीभरण कार्यक्रमास सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी बोलताना नगराध्यक्ष माधवी कदम म्हणाल्या कि, पावसामुळे धरण पूर्ण भरलेले आहे. त्यामुळे पुढील वर्षीपर्यंत आता सातारकरांना पाण्याची टंचाई भासणार नाही. दरवर्षी आम्ही कास धरणाचे ओटीभरण करतो. यावर्षीही धरणाचे ओटीभरण केले आहे. कास तलावाची उंची वाढवण्याचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल.
सातारा शहराला कास तलावातून पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तलाव पूर्णक्षमतेने भरून वाहू लागला आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला झाला. सातारा जिल्ह्यातील अनेक तलाव, धरणे भरू लागली आहेत. सातारा येथील कास तलाव भरल्याने पालिकेच्या प्रथेप्रमाणे तलावात ओटीभरण करण्यात आले आहे.