सातारच्या सुपुत्राचा केंद्रात गौरव : आसामचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्याचे व माणचे सुपुत्र व आसाम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे यांनी निवडणुकीसंबंधी राबविलेल्या नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रमांची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने माण तालुक्याच्या व सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा देशपातळीवर होणारा गौरव प्रत्येकासाठीच अभिमानास्पद वाटत आहे.

कोव्हिड19चा प्रादुर्भाव लक्षात घेता आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूका शांततेत व भितीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे काम यशस्वी पार पाडले. कारण आसाममध्ये अतिरेकी, जातीय आणि वांशिक हिंसाचाराचा मोठा इतिहास आहे. निवडणूकीच्या काळात अतिरेकी हिंसाचाराच्या घटना पूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत. या सर्व घटनांचा सखोल अभ्यास करून एक वेगळा “आसामचा निवडणूक पॅटर्न” तयार करून तो यशस्वी देखील करून दाखविला. याचे फलित म्हणजे मतदानाची टक्केवारी जवळपास 0.5 ने वाढली. निवडणूक कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन सोशल मिडियाचा प्रभावी वापर केला. या दरम्यान 80 वर्षावरील वयोवृद्ध शारीरिक विकलांग असणाऱ्या मतदारांना पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. कोरोना कालावधीत निवडणूक अर्ज भरताना सार्वजनिक मेळावे, मिरवणुकीस मनाई करून प्रचारा दरम्यान रोड शो, मोटार सायकल रॅली काढण्यास सक्तमनाई केली. घरोघरी प्रचारासाठी 5 व्यक्तींनाच परवानगी दिली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुध्द व सोशल मिडियावरुन आणि प्रत्यक्ष शांतता व सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या घटनांना वेळीच पायबंद घालून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवून पायबंद घालण्यात आला. पोलिस आणि प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेत समन्वय राखण्यात आला. असे काही विविध प्रयोग देखील केले. याचा फायदा म्हणजे भयमुक्त वातावरणात मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर पडले. मतदानाची टक्केवारी वाढली.

कोविड सह अनेक आव्हाने समोर असताना देखील नितीन खाडे यांनी अत्यंत नियोजनपूर्वक आणि काटेकोरपणे निवडणूक यंत्रणा राबवली. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत असताना निवडणूक निष्पक्ष रितीने पार पडावी, जास्तीत जास्त मतदारांनी कोविडच्या अनुषंगाने नियमांचे पालन करत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेतली असून त्यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथे एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नितीन खाडे यांना गौरविण्यात येणार आहे.

▪️ बीड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना राबविलेला “आयुर्मंगलम” प्रोजेक्ट आजही त्यांच्याच नावाने ओळखला जातो. याची दखल त्यावेळी तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी घेतली.

राष्ट्रीय पुरस्कारासाठी याच ठरल्या उल्लेखनीय गोष्टी-

▪️14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत कोविड 19 महामारीच्या काळातही एकूण 9 लाख 15 हजार 993 नवीन मतदार मतदार यादीत जोडले गेले.

▪️कोविडचा प्रार्दुभाव असूनही 2019 च्या लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान 0.5 टक्के ने वाढले.

▪️मतदान कर्मचाऱ्याचा कोविड संबंधित मृत्यू झाला नाही आणि हिंसाचारात देखील झाला नाही.

▪️सर्व मतदान कर्मचाऱ्यांचे लसीकरण मार्च पुर्वी पुर्ण केले.

▪️निवडणूका निष्पक्ष अाणि सुरक्षित पार पाडली गेली.

▪️ऑनलाइन यंत्रणा व सोशल मिडियाचा प्रभावी वापर

निवडणूककामी नियुक्त केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोव्हिड चा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांना ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.