कोपरगाव, अहमदनगर प्रतिनिधी | ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया घातलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा यथोचित गौरव व्हावा यासाठी अनेक ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुर्शतपुर येथेही सावित्रीबाई फुलेंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेतील मुलींनी सवित्रीबाई फुलेंप्रमाणे पोशाख परिधान केला होता. साड्या घालून, हाती पाटी-पेन्सिल आणि पुस्तक घेऊन त्या शाळेत दाखल झाल्या. सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित गाणी आणि ओव्या म्हणून मुलींनी कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. सावित्रीबाईंच्या विचाराने शाळेचा परिसर प्रेरणादायी होऊन गेला होता. यावेळी मुख्याध्यापक सौ. गाडेकर, प्रभारी मुख्याध्यापक पंडीत वाघ यांच्यासह शिक्षकवृंद आणि इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाईंच्या विचारांचा प्रभाव पडल्यानेच घरातील मुलीला शिकवलं पाहिजे, तिच्या पंखांना बळ दिलं पाहिजे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाल्याचं वाघ म्हणाले. मुलींनी केवळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन न थांबता त्यांना आवडेल त्या क्षेत्रात काम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहायला हवं असं सौ. गाडेकर म्हणाल्या.