कर्ज झाले स्वस्त! SBI सह ‘या’ बँकांनी केली व्याज दरात कपात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाउन काळात बँकांमध्ये ठेवीचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत कर्ज वितरण कमी झाले आहे. बँकांकडे प्रचंड रोकड उपलब्ध असल्याने त्यांनी व्याजदर कपातीचा मार्ग अवलंबला आहे. परिणामी गृह, वाहन आणि इतर कर्जाचे दर कमी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) व्याज दरात कपात करत दिलासा देणारी बातमी दिली आहे. SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँकांनीही एमसीएलआर (MCLR) दरात कपात केली आहे. याशिवाय खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने व्याजदर कमी केला आहे.

SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्सवर आधारित कर्जदरात (MLCR) ०.०५ ते ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १० जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. स्टेट बँकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मागील महिन्यात देखील SBI ने MLCR कर्ज दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. त्यापूर्वी ०.१५ टक्के अशी आतापर्यंत SBI ने १४ वेळा MLCR च्या व्याजदरात कपात केली आहे. तर कॅनरा बँकेने एमसीएलआरमध्ये ०.१० टक्के कपात केली आहे. यामुळे बँकेचा एक वर्ष मुदतीचा एमसीएलआर ७.५५ टक्के झाला आहे. याआधी तो ७.६५ टक्के होता. याशिवाय एक दिवसाचा एमसीएलआर ७.२० टक्के झाला आहे. तीन महिन्यांसाठीचा एमसीएलआर ७.४५ टक्के झाला असल्याचे बँकेने म्हटलं आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रने देखील एमसीएलआरवर आधारीत व्याजदर ०.२० टक्क्याने कमी केला आहे. बँकेचा १ वर्ष मुदतीचा एमसीएलआर आता ७.५० टक्के झाला आहे. याआधी तो ७.७० टक्के होता. एक दिवसाचा एमसीएलआर ७ टक्के केला आहे. तर एक महिन्यासाठीचा व्याजदर ७. १० टक्के आणि तीन महिन्यांचा व्याजदर ७.२० टक्के केला असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रने म्हटलं आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआर दरात ०.२० टक्क्याची कपात केली आहे. यामळे बँकेचा एक दिवसाचा एमसीएलआर ७.१० टक्के झाला आहे. तर एक महिन्यासाठी तो ७.१५ टक्के असेल. एक वर्षासाठी तो ७.४५ टक्के असेल. ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी एक वर्ष कालावधीचा एमसीएलआर आकारला जातो. तीन वर्षांसाठीचा एमसीएलआर आता ७.६५ टक्के झाला आहे. बँकेने गेल्या महिन्यात देखील एमसीएलआर कर्जदरात ०.०५ टक्क्याची कपात केली होती.

लॉकडाउन काळात बँकांमध्ये ठेवीचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत कर्ज वितरण कमी झाले आहे. बँकांकडे प्रचंड रोकड उपलब्ध असल्याने त्यांनी व्याजदर कपातीचा मार्ग अवलंबला आहे. परिणामी गृह, वाहन आणि इतर कर्जाचे दर कमी होणार आहेत. दरम्यान करोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर वेतन कपात देखील झाली आहे. अशा आर्थिक आणिबाणीमध्ये रिझर्व्ह बँकेने कर्जदारांची सहा महिने कर्जाच्या मासिक हप्त्यांतून सुटका केली आहे. मात्र मागील तीन महिने कर्जाची मागणी ठप्प आहे. यामुळे बँकांची आर्थिक घडी बिघडली आहे. कर्जाला चालना देण्यासाठी बँका प्रयत्न करत आहेत. मार्चपासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात १.१५ टक्के कपात केली आहे. मात्र अजूनही गृह कर्ज आणि वाहन कर्जाचे दर जास्तच आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment