हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या सुविधा देत असते. आता बँक सॅलरी अकाउंटवर काही मोफत सुविधा उपलब्ध करून देत आहे. यासाठी ग्राहकांचे बँकेमध्ये सॅलरी अकाउंट असणे आवश्यक आहे. सॅलरी अकाउंट असल्यास खातेधारकाला विविध आर्थिक सुविधा आणि फायदे मिळू शकतील. या सुविधा नेमक्या कोणत्या आहेत? आपण जाणून घेऊया.
एसबीआय बँक सर्वात प्रथम खातेधारकांना शून्य शिल्लक ठेवून खाते उघडण्याची मुभा देते. याशिवाय, वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाची सुविधा मिळते, ज्यामध्ये 40 लाख रुपयांपर्यंत विमा कवच बँककडून दिला जातो. तसेच, बँक ग्राहकांना हवाई अपघात विम्याची सुविधा देखील देते. यामध्ये बँक एक कोटी रुपयांपर्यंतचा विमा देते. या विम्याची रक्कम हवाई अपघातात ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दिले जाते.
याशिवाय, एसबीआय सॅलरी अकाउंटधारकांना कार लोन, होम लोन आणि पर्सनल लोनवरही विशेष सवलती देखील देते. तर , लॉकरच्या भाड्यावर दरवर्षी 50 टक्के सूट उपलब्ध करून देते. एसबीआयच्या योनो ॲप आणि डेबिट कार्डवर विविध सवलती आणि ऑफर्स देखील मिळतात. इतकेच नव्हे तर, मल्टिसिटी चेक, ड्राफ्ट आणि एसएमएस अलर्टसारख्या सुविधाही बँककडून मोफत दिल्या जातात.