मुंबई । कोरोनाचे संकटाचा बँकिंग व्यवसायावरही परिणाम झाल्यामुळे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) खर्च कमी करण्याचे उपाय सुरू केले आहेत. ‘एसबीआय’ने महिनाभरात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदर कमी करून ठेवीदारांना जोरदार झटका दिला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेने ठेवींच्या व्याजदरात ०.४० टक्क्याची कपात केली आहे. यामुळे बँकेच्या कोट्यवधी ठेवीदारांना फटका बसणार असून व्याजावर खर्च भागविणाऱ्या ठेवीदारांना झळ बसणार आहे. बँकेने सर्वच मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर कमी केला आहे. आजपासून नवे व्याजदर लागू झाले आहेत, असे बँकेनं म्हटलं आहे.
७ ते ४५ दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्के कपात करून तो २.९ टक्के केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता या कालावधीसाठी ३.४ टक्के व्याज मिळेल. याआधी ३.८ टक्के व्याज मिळत होते. तर १ वर्ष ते २ वर्ष कालावधीच्या मुदत ठेवीवर आता ठेवीदारांना ५. १ टक्के व्याज मिळेल. तर ३ वर्ष ते ५ वर्ष मुदतीच्या ठेवीवर ५.३ टक्के व्याज मिळेल. ५ वर्षांहून अधिक आणि १ वर्षांहून कमी कालावधीच्या ठेवींवर ५.४ टक्के व्याज मिळेल, असे बँकेनं म्हटलं आहे. याआधी १२ मे रोजी एसबीआयने तीन वर्ष मुदतीपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर ०.२० टक्क्याने कमी केला होता.
या कपातीचा सर्वाधिक फटका अल्पमुदतीच्या ठेवींना बसणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही ठेवींवर कमी व्याज मिळणार आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिकांचा ठेवीदरात देखील कपात केली आहे. ७ ते ४५ दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्का कपात करून तो ३. ४ टक्के केला आहे. यापूर्वी तो ३.८ टक्के होता. एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्के कपात करून तो ५.६ टक्के केला आहे. यापूर्वी तो ६ टक्के होता. ५ ते १० वर्ष मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा ठेवीदर ६.२ टक्के झाला आहे. याआधी तो ६.५ टक्के होता. २७ मेपासून नवे ठेवीदर लागू झाल्याचे बँकेने म्हटलं आहे. एसबीआयमध्ये निवृत्तीवेतनधारकांची जमापुंजी ठेवीस्वरूपात आहे. या ठेवीदारांचा दरमहा खर्च व्याजावर चालतो. मात्र आज व्याजदर कमी केल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”