हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपलं नेटवर्क वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार बँक आता नवीन आर्थिक वर्षात 400 नवीन शाखा उघडणार आहे. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात 137 शाखा उघडल्या आहेत. त्यापैकी ५९ नवीन ग्रामीण शाखांचा समावेश आहे. त्यात आता नवीन 400 शाखा उघडल्यानंतर बँकेचा व्यवहार आणि अन्य गोष्टी आणखी सोप्प्या होतील.
याबाबत SBI चे अध्यक्ष दिनेश खारा यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला कोणीतरी विचारले की 89 टक्के डिजिटल आणि 98 टक्के व्यवहार शाखेच्या बाहेर होत आहेत, आता शाखेची गरज आहे का? तर होय… शाखांची आणखी गरज आहे. कारण नवीन क्षेत्रे उदयास येत आहेत. बहुतेक सल्लागार आणि संपत्ती सेवा यासारख्या काही सेवा आहेत ज्या केवळ शाखेतून दिल्या जाऊ शकतात असं ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात देशभरात 400 नवीन शाखा उघडण्याची आमची योजना आहे. मार्च 2024 पर्यंत SBI च्या देशभरात 22,542 शाखा होत्या असं दिनेश खारा यांनी सांगितलं.
दरम्यान, सहाय्यक कंपन्यांच्या कमाईबद्दल विचारले असता, खारा म्हणाले की, SBI त्यांची यादी करण्यापूर्वी त्यांचे कार्य आणखी वाढवण्याची प्रतीक्षा करेल. त्यांचे ऑपरेशन वाढवल्याने मूल्यांकन वाढेल आणि पॅरेन्ट एसबीआयसाठी चांगले परतावा सुनिश्चित होईल. उपकंपन्यांचा विचार केला तर त्यांची कमाई भांडवली बाजारातून होईल. कदाचित, आम्हाला ते थोडे अधिक वाढवायचे आहे, आणि नंतर आम्ही या कंपन्यांमधील आमची होल्डिंग कमाई करण्यासाठी भांडवली बाजारात जाण्याचा विचार करू. परंतु चालू आर्थिक वर्षात नाही असं दिनेश खारा यांनी म्हंटल.