शाळा प्रशासनाने आरटीई कायद्याचे उल्लंघन करत शाळा बंद; संतप्त पालकांनी शिक्षण उपसंचालकाला अडवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : शहरातील शाहू नगर भागातील श्री संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल शाळेने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करत पालकांना कसलीही पूर्व सूचना न देता शाळा बंद केली आहे. यामुळे या शाळेत शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत मोफत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आता आपल्या पाल्याचे भवितव्याचे काय असा प्रश्न पडला आहे. यामुळे या सर्व संतप्त पालकांनी एकत्रित येत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच शिक्षण उपसंचालक यांना अडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा अशी मागणी केली.

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण पद्धती राबवण्यात आली होती.परंतु संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल शाळेने मागच्यावर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देखील दिले नाही. या उपर विद्यार्थ्यांना शाळेचे वह्या पुस्तकांची किट घेण्यास भाग पाडले.ही शाळा मान्यताप्राप्त आहे. या शाळेची आरटीई पोर्टलला नोंद आहे. या शाळेमध्ये आरटीईअंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रवेश आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत एकदा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले जाईल असे स्पष्ट आहे. परंतु शाळा प्रशासनाने शाळाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन केले आहे. तसेच या शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना अधांतरी राहण्याची वेळ आली आहे. आता या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या मोफत शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.
त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.

शाळा बंद झाल्यानंतर या सर्व पालकांनी मिळून प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. मात्र त्या निवेदनावर अद्याप काहीच कारवाई करण्यात आली नाही. जर शिक्षण विभागाने या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पाल्यांचा भविष्याचा विचार नाही केला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिक्षणतज्ञ आरटीआय कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिला आहे.

या संदर्भात संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला, गोरगरीब विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश केल्यामुळे दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना लाभ द्यायचा कसा हा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे. तसेच या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार का?हा देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Comment