इंदूर : वृत्तसंस्था – इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावे सुसाईड नोट लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ‘सॉरी आई मी बिघडलो आहे, मला माफ कर’, मला घरी यावस वाटत नाही, आणि कुठे जावसही वाटत नाही. मला घरातील परिस्थिती पाहवत नाही. जाऊ तर कुठे जाऊ असे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. हा तरुण घरातील आर्थिक स्थितीमुळे त्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला ऑनलाइन सट्ट्याचं व्यसन लागलं होते.
आर्थिक अडचणीमुळे ऑनलाइन जुगाराची सवय
जितेंद्र वास्कले असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. जितेंद्र वास्कले हा खरगोन या ठिकाणचा रहिवाशी होता. तो बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होता. बीएच्या अभ्यासासाठी त्याने इंदूरमध्ये भंवरकुआ भागात भाड्याने घर घेतले होते. अभ्यासाबरोबर तो सिक्युरिटी गार्डची नोकरीसुद्धा करत होता. त्याच्या घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे खूप पैसे कमावण्याच्या ईर्षेने तो ऑनलाइन जुगार खेळू लागला.
जुगार खेळण्यासाठी त्याने ऑनलाइन कंपनीकडून लोन घेतलं होतं. मात्र जुगारात तो सर्व पैसे हरला. यानंतर कर्ज फेडण्यासाठी कंपनी त्याला सतत फोन करू लागली. यामुळे त्रस्त होऊन या तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या बहिणीला फोनवर सॉरी मेसेज लिहून तिची माफी मागितली. बहिणीने त्याला कारण विचारले मात्र त्याने जितेंद्रने काहीच उत्तर दिले नाही. यानंतर त्याने आपल्या आईच्या नावे सुसाईड नोट लिहून आपल्या आयुष्याचा शेवट केला.