Oscar Award 2025| अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या 97 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील उत्कृष्ट सिनेमांचे सन्मान करण्यात आले आहेत. भारतीय वेळेनुसार 3 मार्च रोजी सकाळी 5:30 वाजता हा भव्य सोहळा पार पडला. यंदा ‘अनोरा’ या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपटाचा मान पटकावला आहे. तर शॉन बेकर यांना त्याच चित्रपटासाठी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
प्रमुख अभिनय पुरस्कार (Oscar Award 2025)
या सोहळ्यामध्ये अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले. ‘द ब्रुटालिस्ट’ चित्रपटासाठी अॅड्रियन ब्रॉडी यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर ‘अनोरा’ चित्रपटासाठी मिकी मॅडिसन यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यावेळी ‘अ रिअल पेन’ चित्रपटातील भूमिकेसाठी किरन कल्किन सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता ठरले. तर ‘एमिलिया पेरेझ’ या चित्रपटासाठी झो सलडाना हिने सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
पटकथा, संगीत आणि तांत्रिक श्रेणीतील चित्रपट
यंदा पटकथा विभागातही ‘अनोरा’ चित्रपटाने बाजी मारली आहे. शॉन बेकर यांना सर्वोत्तम मूळ पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘कॉन्क्लेव्ह’ चित्रपटाने सर्वोत्तम रूपांतरित पटकथेचा सन्मान मिळवला आहे. संगीत विभागात ‘द ब्रुटालिस्ट’ चित्रपटासाठी डॅनियल ब्लूमबर्ग यांना सर्वोत्तम मूळ संगीताचा पुरस्कार मिळाला आहे.
‘फ्लो’ला सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपट पुरस्कार
यावर्षी अॅनिमेशन विभागातही जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. परंतु ‘फ्लो’ या चित्रपटाने सर्वोत्तम अॅनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. तसेच, ‘इन द शॅडो ऑफ द सायप्रस’ या लघुपटाला सर्वोत्तम अॅनिमेटेड लघुपटाचा सन्मान मिळाला.
दरम्यान, ऑस्कर 2025 (Oscar Award 2025)सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा सन्मान ‘आय अॅम स्टिल हिअर’ या चित्रपटाला मिळाला. यासह’द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा’ला सर्वोत्तम माहितीपट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. तर ‘नो अदर लँड’ने सर्वोत्तम माहितीपट वैशिष्ट्य चित्रपट पुरस्कार पटकावला. पोशाख डिझाइनमध्ये ‘विक्ड’ने बाजी मारली, तर ‘द सबस्टन्स’ने सर्वोत्तम मेकअप आणि हेअर स्टायलिंगचा पुरस्कार जिंकला. प्रोडक्शन डिझाइनसाठीही ‘विक्ड’ला सन्मानित करण्यात आले.