जेव्हा मुख्यमंत्री तहसीलदारासाठी खुर्ची सोडतात; वाचा नेमकं काय घडलं..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । मंत्री असो वा गावातील साधा सत्ताधारी पक्षाचा नेता नेहमीच प्रशाकीय अधिकाऱ्यांना दुय्यम समजतात असा सामान्य अनुभव. आम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून अधिकाऱ्यांनी आमचा मान राखला पाहिजे याच तोऱ्यात पुढारी मंडळी वावरत असतात. मात्र, सर्व या समजांना आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाटा देत वेगळे उदाहरण निर्माण करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुख्यमंत्री सांगलीतील वाळवा तालुक्यातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटनानंतर इमारतीची पाहणी करण्यासाठी ते तहसीलदार कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांना तहसीलदाराच्या खुर्चीवर बसवण्यात आले. मात्र, बसल्यानंतर ही तहसीलदारांची खुर्ची असल्याचे समजताच मुख्यमंत्री त्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी सन्मानाने खुर्चीवर तहसीलदाराला बसवले. मुख्यमंत्र्यांच्या या वागणुकीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुर्चीवरून उठले आणि समोर उभे असलेले नेते आणि मोठ्या अधिकाऱ्यांच्या गर्दीत उभे असलेले तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या जवळ गेले. मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला खुर्चीपर्यंत आणले. त्यांनी विचारले,  “तुम्ही तहसीलदार ना, मग ही खुर्ची तुमची आहे, बसा इथे” असं म्हणाले.

मात्र, खरी गम्मत तेव्हा आली जेव्हा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मंत्री, राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे शिष्टाचाराचा भाग म्हणून तहसीलदार खुर्चीवर बसण्यास तयारच होत नव्हते. मी या खुर्चीवर कसे बरे बसू शकतो, असे तहसीलदार नम्रपणे म्हणाले. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘ही इमारत तुमची आहे, इथले प्रमुख अधिकारी या नात्याने तुम्हाला काम करायचे आहे, ही खुर्ची तुमची आहे, या खुर्चीवर मी स्वत: तुम्हाला बसवत आहे.’ असं म्हणतं मुख्यमंत्री ठाकरे यांनी आग्रहाने तहसीलदारांना खुर्चीत बसवले. ठाकरे यांच्या या कृतीची सोशल मीडियावर चांगली प्रशंसा होत आहे. सोबतच अशी वागणूक प्रत्येक राजकीय पुढाऱ्याने प्रशासकीय अधिकाऱ्याला द्यावी अशी अपॆक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

Leave a Comment