कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग महाविद्यालयातील सुमारे २३३ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. जागतिक नर्सिंग दिनानिमित्त या दोन्ही नामांकित संस्थांनी नुकतेच कृष्णा नर्सिंग महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून २३३ विद्यार्थी-विद्यार्थींनींची स्टाफ नर्स व नर्स एज्युकेटर या पदांसाठी निवड केली.
गेल्या वर्षापासून जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा स्थितीत कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्ससह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर विविध नामांकित हॉस्पिटल्सनी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफची भरती करण्यास प्रारंभ केला असून, तज्ज्ञ व कुशल स्टाफच्या नेमणुकीला प्राधान्य दिले जात आहे. याच उद्देशाने जागतिक नर्सिंग दिनाचे औचित्य साधून मुंबईतील लिलावती हॉस्पिटल व संशोधन केंद्र आणि कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्यावतीने कृष्णा नर्सिंग महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते.
या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी लिलावती हॉस्पिटलच्या मनुष्यबळ व्यवस्थापक सौ. अपर्णा प्रभू, नर्सिंग सेवा विभागाच्या सहप्रमुख मृणाल वीरकर, कर्मचारी विकास विभागाच्या समन्वयक वैशाली वाघमारे, सुरक्षाप्रमुख विद्याधर पाटील प्रमुख उपस्थित होते. तसेच कोकिलाबेन धीरुबाई अंबानी हॉस्पिटलच्या नर्सिंग विभागाच्या सरव्यवस्थापक हवोवी फौजदार, स्नेहा करमळकर, कनिष्ठ मनुष्यबळ अधिकारी श्रुती तावडे उपस्थित होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतराच्या नियमांचे योग्य पालन करत या कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बी.एस्सी. नर्सिंग व जी.एन.एम. नर्सिंगच्या च्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या २०८, तर ५५ माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींची अशी एकूण २६३ जणांची मुलाखत घेण्यात आली. यापैकी २३३ विद्यार्थी-विद्यार्थींनींची निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रा. मनिषा घोलप, लक्ष्मी नायर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर तेजस भोसले, स्वाती इंगळे, निशी पै यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
नर्सिंग महाविद्यालयातील 2 हजारांहून अधिक विद्यार्थी देशविदेशात कार्यरत ः डाॅ. वैशाली मोहिते
सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९८३ साली कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली. त्यावेळी दरवर्षीची प्रवेश क्षमता अवघी २० होती, जी आज २३० झाली आहे. आप्पासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे. सद्यस्थितीत कृष्णा नर्सिंग महाविद्यालयात दरवर्षी जी.एन.एम. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ६०, बेसिक बी.एससी. नर्सिंगसाठी १००, पोस्ट बेसिक बी.एससी. नर्सिंगसाठी ४०, नर्स प्रॅक्टिशनर इन क्रिटीकल केअरसाठी २०, एम.एससी. नर्सिंग पाच स्पेशॅलिटी अभ्यासक्रमांसाठी २०, तसेच पी.एचडी. अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले २००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. मुंबईतील लिलावती हॉस्पिटल आणि अंबानी हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा कृष्णा नर्सिंग अधिविभागाच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी केली.