परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणी जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे दोन आठवड्या पुर्वी निष्पन्न झाले होते. हा पेशंट आता ठणठणीत बरा झाल्यानंतर, पुन्हा उपचारासाठी बाहेरून आलेल्या सेलू येथील महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे ढग दाटले आहेत. त्यामुळे सदरील रुग्ण राहत असलेला परिसर तीन किलोमीटरपर्यंत सील करत, सेलू शहरांमध्ये तीन दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सेलू शहरातील ५५ वर्षीय महिला आरोग्य उपचारासाठी औरंगाबाद येथे गेली होती. २७ एप्रिल रोजी सदरील महिला सेलू शहरांमध्ये वापस आली. यावेळी या महिलेची तब्येत खालावल्याने परभणी येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले होते. दरम्यान सदरील महिलेचा उपचार करण्यास खासगी डॉक्टरांनी नकार दिला. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणी मध्ये सदरील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग परत खडबडून जागा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या संपर्कामध्ये आतापर्यंत १९ व्यक्ती आल्याची माहिती मिळत आहे. या महिलेने सेलू ते नांदेड दोन रुग्णवाहिकेत द्वारे प्रवास केल्याचेही पुढे आले आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय घेत सेलू शहरातील कोरोना बाधित रुग्ण महिला राहत असलेल्या परिसराला तीन किलोमीटर पर्यंत सील केले आहे. तर सेलू शहरांमध्ये १ मे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
दरम्यान १६ एप्रिल रोजी जिल्ह्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणारा २१ वर्षीय मुलगा पुण्यावरून आल्यानंतर कोरणा संसर्ग पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. चारच दिवसांपूर्वी सदरील रुग्ण याच्या दोन तपासण्या नेगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. परंतु आता परत जिल्ह्यात रुग्ण आढळल्याने यंत्रणेमध्ये धावपळ वाढली आहे. सोबतच जिल्ह्यातील नागरिकांनी सर्तक राहत, काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.