सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारे हवामानातील बदल, त्याचे दुष्परिणाम आणि त्यामुळे वेळोवेळी येणाऱ्या आपत्ती याबाबत जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना जाणीव व्हावी, यावरील उपाययोजना जाणून घेवून आपले शेती उत्पादन वाढवावे या उद्दात हेतूने “ग्लोबल वॉर्मिंग – ग्लोबल वॉर्निंग” जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम व उपाययोजना या विषयावर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, डीस्ट्रीक्ट 3234 -D1 रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय, सातारा येथे परिसंवाद आयोजित केल्याची माहिती सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिलेली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. आदित्यजी ठाकरे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्ठाचार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सातारा, मा.ना. नीलमताई गोऱ्हे, महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती, मा.खा. वंदनाताई चव्हाण, मा.आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा.आ.मकरंद पाटील, सिने अभिनेत्री व पर्यावरण कार्यकर्त्या मृण्मयी देशपांडे यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि सामाजिक कार्यकर्ते व सिनेअभिनेते आमिर खान, सयाजी शिंदे ऑनलाईन उपस्थित रहाणार आहेत.
या परिसंवादात पर्यावरण तज्ञ मा. खा. वंदनाताई चव्हाण, कामधेनु विद्यापीठ, गांधीनगरचे कुलगुरू मदनगोपाल वार्षनेय, पर्यावरण तज्ञ डॉ. गुरुदास नुलकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ हे कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचेसाठी समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन प्रदर्शित केला जाणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात तसेच तालुक्याच्या ठिकाणी बँकेच्या विभागीय कार्यालयात किंवा समाज माध्यमांवर ऑनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, लायन्स क्लबचे प्रांतपाल एमजेएफ ला. सुनिल सुतार, प्रांतिय चेअरमन, पर्यावरण एमजेएफ ला. डॉ. शेखर कोवळे यांनी केले आहे.