औरंगाबाद – आरटीईअंतर्गत प्रवेश दिलेल्या 25 टक्के विद्यार्थ्यांचा शुल्क परत मिळावा म्हणून इंग्रजी शाळेला प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्या वरिष्ठ सहाय्यक संपत नारायण गीतेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
एका इंग्रजी शाळेने दोन वर्षांपूर्वी शुल्क परताव्यासाठी आवश्यक असलेले आरटीई 2 प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केले होते. शाळेचे लिपिक वारंवार चकरा मारत असताना गीते त्यांना भेटला. त्याने प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यावर लीपिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली.
त्यावरून निरीक्षक हनुमंत वारे, पोलीस नाईक बाळासाहेब राठोड, सुनील पाटील, विलास चव्हाण यांनी शहानिशा केली. त्यामध्ये वरिष्ठ सहाय्यकाने लाच मागितल्याचे निष्पन्न होताच त्यांनी गुरुवारी गादिया विहारातील कार्यालयाजवळ सापळा रचून गीते दालनाबाहेर येऊन जिन्याजवळ लाच स्वीकारताच पथकाने रंगेहाथ पकडले. यासंदर्भात वेदांतनगर पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.