टीम, HELLO महाराष्ट्र। जेष्ठ नागरिकांना वय झाल्यानंतर कौटुंबिक कलहामुळे बऱ्याच वेळा आपले राहते घर सोडून जावे लागते. स्वतःच्या मुलांकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांना त्यांच्या उतारवायामध्ये वणवण भटकावे लागते. त्यांच्या सोबत बऱ्याच वेळा गैरव्यवहार झाल्याचे देखील पाहण्यात येते. मात्र आता यावर आता सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहेत. मुलांसमवेत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर किंवा पालकांबरोबर हेतुत: गैरव्यवहार करणाऱ्यांना किंवा त्यांना सोडून देणाऱ्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास किंवा दहा हजार रुपयांचा दंड किंवा या दोन्ही शिक्षा लागू होतील, असे विधेयक लोकसभेत बुधवारी सादर करण्यात आले. या विधेयकामुळे ‘ज्येष्ठ नागरिक आणि पालक कल्याणकारी कायदा, २००७’मध्ये सुधारणा केली जाणार आहे.
दरम्यान सामाजिक न्यायमंत्री तावरचंद गेहलोत यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. गैरव्यवहारामध्ये शारीरिक, तोंडी, भावनिक आणि आर्थिक बाबींचा समावेश आहे. त्यांची काळजी न घेणे, त्यांना सोडून देणे, त्यांना जखमी करणे, शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे यासाठी कायद्यातील नव्या सुधारणेनुसार शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे; या विधेयकाद्वारे ज्येष्ठांसाठी एका लवादाची स्थापना करण्यात येणार आहे. या लवादाकडे ज्येष्ठांना दाद मागता येणार आहे. ८० वयावरील ज्येष्ठांनी या लवादाकडे केलेले अर्ज ६० दिवसांत निकाली काढण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे लवादाला हा कालावधी केवळ ३० दिवसांनी वाढवता येणार आहे. दरम्यान या विधेयकामुळे जेष्ठांना फायदा मिळणार आहे.