हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सकाळ असो किंवा संध्याकाळ मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) गर्दी कधीच कमी झालेली नसते. त्यामुळे अशा गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करणे अशक्य होऊन जाते. अनेकवेळा तर घाईत असलेले प्रवासी हे जेष्ठ नागरिकांशी वाद घालताना धक्काबुक्की करतानाही दिसून येतात. त्यामुळेच यावर लोकल विभागाकडून एक उत्तम पर्याय काढण्यात आला आहे. या पर्यायामुळे मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखाचा आणि आरामदायी होणार आहे.
दररोज लोकलमध्ये ज्येष्ठ प्रवाशांचे होणारे हाल बघून रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक डब्बा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई लोकलमध्ये दररोज सकाळची प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे सर्वाधिक हाल होतात. ही अडचण लक्षात घेऊनच उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यावर तोडगा काढण्यास सांगितले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर रेल्वेने माल डब्यांचे ज्येष्ठ राखीव डब्यात रूपांतर करण्याचे नियोजन आखले होते.
यासाठीच रेल्वेकडून तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवण्यात आला होता. आता याच प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाच्या लोकलमध्ये ज्येष्ठांसाठी राखीव डबा सुरू होईल. तसे पाहता एका लोकलमध्ये चार मालडब्बे असतात. यातीलच एका माल डब्याचे रूपांतर ज्येष्ठ राखीव डब्यात करण्यात येणार आहे. या माल डब्यात 104 प्रवाशांची क्षमता आहे तर 13 आसने आणि 91 उभे प्रवासी अशी आसनक्षमता आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या डब्यात आरामदायी प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, प्रत्येक लोकांच्या पहिल्या आणि शेवटच्या सेकंड क्लास डब्यात सात आसने जेष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. तसेच 12 डब्यांच्या लोकलमध्ये 4 फर्स्ट क्लासचे डबे आहेत. यातील तीन महिलांसाठी आणि दोन डबे दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव आहेत. उर्वरीत डबे सर्वसामान्य जनतेसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा ठेवला जाणार आहे