धार्मिकीकरणाच्या आरोपांनंतर दुखावलेल्या वासिम जाफरने सोडलं उत्तराखंडचे प्रशिक्षकपद; माजी खेळाडू आले पाठिंब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह वासिम जाफरवर (Wasim Jaffer) धार्मिकीकरणाचे आरोप झाल्यावर अखेर त्यानं उत्‍तराखंड क्रिकेट टीमचे प्रशिक्षकपद सोडलं आहे. वासिमवर उत्‍तराखंड क्रिकेट टीमचे सचिव माहिम वर्मा यांनी संघनिवडीदरम्यान मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर वासिम जाफरने संघातील खेळाडूंना जय श्रीराम आणि जय हनुमानच्या घोषणा देण्यापासूनही रोखल्याचा आरोप आहे. मात्र हे सर्व आरोप जाफरने फेटाळले असून याबाबत स्पष्टीकरण आरोपांना दुखावून उत्तराखंड क्रिकेट संघाचं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.

माहिम वर्मांच्या आरोपानुसार, “मंगळवारी काही खेळाडू माझ्याकडे आले, त्यांनी जे सांगितलं ते हैराण करणारं होतं. जाफर टीममध्ये धार्मिकीकरण करत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं. काही खेळाडू रामभक्त हनुमान की जय ही घोषणा देऊ इच्छित होते. मात्र जाफरने त्यांना रोखलं. इतकंच नाही तर काही दिवसांनी बायो-बबल ट्रेनिंगमध्ये एक मौलवी आले आणि त्यांनी मैदानात दोनवेळा नमाज पठण केलं. मात्र या ट्रेनिंगमध्ये एक मौलवी प्रवेशच कसे करु शकतात? मी खेळाडूंना आपल्याला आधी का सांगितलं नाही असा प्रश्न केला”

दरम्यान, वासिम जाफरने आपल्यावरील आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. जाफर म्हणाला, “सर्वात आधी मला हे स्पष्ट करायचं आहे की, रामभक्त हनुमान की जय ही घोषणा कधीच दिली गेली नाही. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस मॅच खेळत होतो, तेव्हा खेळाडू ‘राणी माता सच्चे दरबार की जय’ अशी घोषणा देत होते. मी कधीच त्यांना जय हनुमान किंवा जय श्रीरामचा नारा देताना पाहिलं नाही. तो एक शीख धर्मियांचा नारा होता. टीममधील दोन शीख खेळाडू ही घोषणा देत होते.

जाफर म्हणाला, “मी कर्णधारपदासाठी इक्बाल ऐवजी जय बिश्त शिफारस केली होती. परंतु सीएयूचे प्रशासन इक्बालला अनुकूल होते. मी कुठल्याही मौलवीला बोलावलं नाही. निवड समिती आणि सचिवांच्या पक्षपातीपणामुळं आणि अपात्र खेळाडूंच्या निवडीसाठी मी राजीनामा दिला आहे. ज्यावेळी आम्ही बडोद्याला पोहोचलो, त्यावेळी मी खेळाडूंना सांगितलं, आम्ही एका धर्मासाठी नाही तर उत्तराखंडसाठी खेळत आहोत. त्यामुळे आपली घोषणा उत्तराखंडसाठी हवी. आपली घोषणा, “गो उत्‍तराखंड, लेट्स डू इट उत्‍तराखंड आणि कमऑन उत्‍तराखंड” अशी हवी. जर मला धर्मालाच प्रमोट करायचं असतं, प्रसार किंवा प्रचार करायचा असता तर मी अल्लाह-हू-अकबरचा नारा द्यायला सांगितलं असतं. त्यामुळे माझ्यावरील धार्मिक आरोप चुकीचा आहे”असं स्पष्टीकरण वासिम जाफने दिलय.

दरम्यान, क्रिकेट विश्वातील खेळाडू आता वासिम जाफरच्या पाठिंब्यात उभे राहिले आहेत. भारताचा माजी फिरकीपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याने वासिमबद्दल सहानुभूती दाखवली आहे.” मी तुझ्यासोबत असून तुला जे योग्य वाटते ते तू कर. खरं तुझ्यासारखा मार्गदर्शक न लाभणं हे त्या संघाच्या खेळाडूंचं दुर्दैव आहे. तर भारताचा वेगवान गोलंदाज इरफानने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं कि, ”तुला स्पष्टीकरण द्यावं लागण हे दुर्दैव आहे.”

43 वर्षीय वासिम जाफर हा भारताचा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने धावांचा रतीब घातला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 57 शतकं झळकावली आहेत. 260 प्रथम श्रेणी सामन्यात जाफरने तब्बल 19 हजार 410 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 57 शतकं आणि 91 अर्धशतकं ठोकली. नाबाद 314 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.