सातारा | खंडाळा तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील पिंपरे बुद्रुक येथील एकाच कुटुंबातील विचित्र घटना घडली असून यामध्ये एक सात वर्षांचा मुलगा आपल्या 65 वर्षांच्या आजीसोबत दोन दिवसापूर्वी घरातून निघून गेला आहे. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मात्र बेपत्ता आजीचा मृतदेह नीरा उजव्या कालव्यात आढळून आला आहे, तर दुसरीकडे त्याची आजारी आईही राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिंपरे बुद्रुक येथे कांताबाई बापू कराडे (वय- 65) या आपली मुलगी पद्मा बापुराव कराडे (वय- 32) व तिचा मुलगा सत्यजित ऊर्फ बंटी दादासो गलांडे (वय- 7) हे एकत्र राहतात. त्यांची मुलगी पद्मा गेल्या दोन वर्षांपासून आजारी होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आजी कांताबाई व नातू सत्यजित हे गावातून बेपत्ता झाले होते. दि. 14 रोजी दुपारी 4 च्या सुमारास कांताबाई यांचा रावडी बुद्रुक (ता. फलटण) गावाच्या हद्दीत नीरा उजव्या कालव्यात मृतदेह आढळून आला. नातू सत्यजित ऊर्फ बंटी अद्यापही बेपत्ता आहे. लोणंद पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, घरी आजारी अवस्थेत असलेली सत्यजितची आई व मृत कांताबाई यांची मुलगी पद्मा याही शनिवारी राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार नसून आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कांताबाई यांचे दीप हणमंत चांगदेव कराडे ( रा.पिंपरे बुद्रुक) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सपोनि विशाल वायकर व पोलिस कर्मचारी या घटनेचा तपास करत आहेत.