Sunday, April 2, 2023

‘माझी मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी’; JNUची माजी विद्यार्थिनी शेहला रशीदवर वडिलांचे गंभीर आरोप

- Advertisement -

श्रीनगर । पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात JNUची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदवर तिच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. अब्दुल रशिद शोरा यांनी आपली मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असून, आपल्याला तिच्यापासून धोका असल्याचं म्हटलंय. तसं पत्रच अब्दुल राशिद शोरा यांनी जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना पाठवलं आहे. इतकच नाही तर शोरा यांनी आपली पत्नी जुबैदा शौर, मोठी मुलगी आसमा रशीद आणि एक पोलिस कर्मचारीही शेहला रशीद सोबत असल्याचा आरोप केला आहे. अब्दुल राशिद शोरा यांनी डीजीपींना 3 पानी पत्र पाठवलं आहे. त्यात आपली मुलगी देशविरोधी आहे. ती देशा विरोधातील अनेक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. (Serious allegations by father against JNU alumnus Shehla Rashid)

दुसऱ्या बाजूला शेहला रशीदने वडिलांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वडिलांचे आरोप हे आधारहीन आणि घृणास्पद असल्याचं तिने म्हटलंय. त्याचबरोबर ‘कुठल्याच परिवारात असं होत नाही, जसं माझ्या वडिलांनी केलं आहे. त्यांनी माझ्यासह माझी आई आणि बहिणीवरही गंभीर आरोप केले आहेत’, असं ट्वीट शेहला रशीद हिने केलं आहे.

- Advertisement -

‘तुमच्यातील अनेकांनी मला जन्म दिलेल्या वडिलांचा व्हिडीओ पाहिला असेल. ज्यात ते माझी आणि बहिणीवर खोटे आरोप करत आहेत. साध्या शब्दात सांगायचं झालं तर ते पत्नीला मारझोड करणारे, अपमानकारक व्यक्तिमत्व आहे. आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा स्टंट त्यावरीलच एक प्रतिक्रिया आहे’ असंही शेहला रशीदने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांची बाजूही समोर आली आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी शेहला यांच्या वडिलांनी लिहिलेल्या पत्राची सत्यता तपासण्यासाठी श्रीनगरच्या एसएसपींना पाठवल्याचं सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’