हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांची ‘एशियन ऑफ दी इयर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. द स्ट्रेट्स टाईम्स ऑफ सिंगापूरने अदार पूनावालासह सहा जणांना एशियन ऑफ द इयर सन्मानासाठी निवडले आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मोलाचा वाटा उचलल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
सिंगापूर येथील ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वर्तमानपत्राकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी आशियातील सहा व्यक्तींची निवड झाली आहे.त्यात आदर पुनावाला यांच्यासह चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि चीनचे संशोधक झँग योंगझेन, सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग, दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची स्थापना 1966 मध्ये अदार पुनावाला यांचे वडील सायरस पुनावाला यांनी केली होती. अदार पुनावाला यांनी वयाच्या 30 व्या वर्षी 2011 मध्ये सीरम इन्स्टिट्युटची जबाबदारी आपल्या हाती घेतली. सीरम इन्स्टिट्युट गरीब देशांना कोरोना लसींपर्यंत पोहोचवण्यास मदत करत आहे.
पुरस्कार जाहीर करताना ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ ने म्हटले आहे की, कोरोना या महामारीने अनेकांचा जीव घेतला आहे. परंतु, प्रचंड लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या ‘व्हायरस बस्टर्स’नी या आव्हानात्मक काळात देखील उत्तम काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला आम्ही सलाम करतो. जगातील जनजीवन पूर्णपणे थांबले असताना पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आशेचा किरण असल्याचे दाखवून दिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’