औरंगाबाद : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्याचबरोबर वाहतूक कोंडी, मोर्चा, दंगल तसेच आणिबाणीच्या परिस्थितीत पोलीस यंत्रणा लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचावी यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतून 176 कोटी रुपये खर्च करून शहरातील वेगवेगळ्या 418 ठिकाणी सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या कॅमेराचे फुटेज चेक करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले असल्याचे समजले आहे.
शहर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मास्टर सिस्टीम इंटिग्रेडर प्रकल्प अंतर्गत या अभियानात सहभागी झालेल्या शहरांना राबवणे बंधनकारक आहे. म्हणूनच औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या प्रकल्पाचे काम हाती घेतले असून याअंतर्गत मनपा मुख्यालयात ऑपरेशन कमांड अँड कंट्रोल सेंटर, पोलीस व्हिव्हिंग सेंटर, डेटा सेंटर या कामांचा देखील यामध्ये समावेश आहे. हे सर्व कामे पूर्ण झाले असल्याची माहिती औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली यांनी दिली आहे.
या सातशे कॅमेरापैकी 600 फिक्स कॅमेरे असून 100 फिरते कॅमेरे आहेत. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील 14 पोलिस स्टेशन येथील काही विभाग सीसीटीव्हीने एकमेकांशी जोडण्यात आले आहेत.170 चौरस किलोमीटरचा परिसर या सीसीटीव्हीच्या नजरेत आला असून पोलिस आयुक्त कार्यालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये 20 कर्मचारी नियुक्त करण्यात आले. हे सेंटर मनपा मुख्यालयात उभारण्याचे काम सुरू असून तेथेही 15 ते 20 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या कॅमेरा मध्ये कैद झालेल्या घटना पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल सेंटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात. त्याचबरोबर बेवारस वस्तू, जास्त गर्दी झाल्यास कंट्रोल रूम मध्ये त्या क्षणी अलार्म असतो. विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीचा शोध घ्यायचा असल्यास त्याचे वर्णन अपलोड करून तीच व्यक्ती दिसल्यास कंट्रोल रूम मध्ये तात्काळ अलार्म वाजतो. या कॅमेऱ्यांमुळे मंगळसूत्र चोरी आणि इतरही गुन्ह्यांच्या तपासात मदत मिळाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक बोंडेकर यांनी सांगितले.यावेळी अलाइड डिजिटल सर्व्हिसेसचे प्रकल्प व्यवस्थापक आशिष शर्मा, अर्पिता शरद उपस्थित होत्या.