लातूर प्रतिनिधी |“मासिक पाळी ही अपवित्र,विटाळ आहे हीच मोठी अंधश्रध्दा आहे, सर्व महिलांनी मासिक पाळी चा अभिमान बाळगला पाहिजे,” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री डॉ.राणी बंग ( गडचिरोली)यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित’ ‘गुंफू हातामध्ये हात, फुलू पुन्हा एक साथ’ विषायांतर्गत तीन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेत पहिल्या सत्रात त्या “काय बाय सांगू, कसं ग सांगू ‘ या विषयावर बोलत होत्या.
त्या म्हणाल्या,’ लैंगिकतेबद्दल चुप्पी सोडली पाहिजे. कुटुंबात, समाजात याबाबत मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे. समलैंगिक संबंधांना समजून घेऊन अशा व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला तो मान्य करावा.’
‘बाईचा जन्म सहन करण्यासाठीच असे मानणे, हे सर्वात मोठे सामाजिक प्रदूषण. उत्क्रांतीच्या टप्प्यावर पुरुषाचा मेंदू हा स्रीच्या मेंदू पेक्षा 11 टक्क्यांनी मोठा असला तरी सूक्ष्म विचार करणे, निर्णय घेणे, तर्क करणे, संशोधन करणे अशाबाबतीत स्त्रीचा मेंदू हा, अकरा टक्क्याने पुरुषाच्या मेंदू पेक्षा अधिक प्रगल्भ आहे, असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्यामुळे स्त्रियांचा मेंदू अधिक परिपक्व असून, सूक्ष्म हालचालींचा अर्थ लावण्याची क्षमता स्त्रियांमध्ये अधिक असते. म्हणून स्त्री ही पुरुषाच्या तुलनेत तसूभरही कमी नाही, तिनेही स्वतःला कमी लेखू नये, असा अभ्यासपूर्ण सल्ला डॉ. राणी बंग यांनी दिला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महिला विभाग व सोशल मिडिया विभाग यांच्यामार्फत , गुंफू हातांमध्ये हात ,फुलू सारे एक साथ, या मुख्य विषयाला अनुसरून तीन दिवसांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आज अनेक क्षेत्रात महिला संपूर्ण क्षमतेने कार्यरत असून, त्या स्वतःचा तसेच त्या क्षेत्राचा वैशिष्टपूर्ण विकास साधत आहेत. मुल न होण्यात 75 टक्के पुरुषांचा दोष असूनही, मूल न होणे किंवा मुलगा न होणे यात स्रीलाच जबाबदार धरुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो. त्यामुळे काही महिला मूल व्हावे म्हणून बुवा बाबा कडे जातात, त्यात त्यांचे शोषण होते.
खरं तर, गर्भात एकदा फलनक्रिया झाली की कुणीही गर्भाचे लिंग बदलू शकत नाही, हे शास्त्रीय सत्य आपण स्विकारलेच पाहिजे. आज समाजात मुलांपेक्षा मुलीच आई-वडिलांचा सांभाळ अधिक चांगल्या प्रकारे व मोठ्या संख्येने करताना दिसतात. म्हणून वंशाचा दिवा म्हणजे मुलगा हवा, या अंधश्रद्धेला अजिबात थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.
कुटुंब नियोजनात 85% शस्त्रक्रिया या महिलांच्या तर केवळ 15 टक्के शस्त्रक्रिया या पुरुषांच्या होतात. वास्तविक पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया कमी वेळेची व कमी त्रासाची असते. पण तरीसुद्धा ती स्त्रीवरच लादली जाते. कुटुंब नियोजनात गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन, तांबी वापरणे याबाबतीतही स्त्रियांमध्ये प्रचंड अज्ञान आणि गैरसमज आहेत. चुकीच्या पद्धतीने गोळ्यांचे सेवन करणे, साधनांचा वापर करणे, यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक वाढते.
नववधूची कौमार्य चाचणी ही अत्यंत विकृत, किळसवाणी आणि मानहानीकारक प्रथा आपल्या समाजात आज ही रूढ आहे. तिला आपण विरोध केला पाहिजे. नीतीचे नियम स्त्रीपुरुष दोघांसाठी सारखे असले पाहिजेत. आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे, याबद्दल त्यांनी खेद व चिंता व्यक्त केली.व्याख्यानात पाचशेहून अधिक प्रेक्षक सहभागी झाले होते. त्यात महिला श्रोत्यांचे प्रमाण अधिक होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सविता शेटे (बीड), निमा शिंगारे, (नवी मुंबई)यांनी स्वागत केले, सूत्रसंचालन कल्पना बोंबे(ठाणे) यांनी केले., प्रश्न वाचन जयश्री चव्हाण (नंदुरबार). रुक्साना मुल्ला यांनी आभार मानले. राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, माधव बावगे, सुशीला मुंडे, नंदकिशोर तळाशीलकर, सुरेखा भापकर, अवधूत कांबळे, सुयश तोष्णीवाल, सारिका डेहनकर आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
माधव बावगे,
राज्य प्रधान सचिव,
महा. अंनिस
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा