शहीद भगतसिंग जयंती विशेष । भगत सिंहांचे वकील प्राण मेहता २३ मार्च रोजी भगतसिंहांना भेटायला गेले होते. फाशीचा दिवस असूनही भगत सिंहांच्या चेहऱ्यावर कसल्याही चिंतेचा किंवा भीतीचा भाव दिसत नव्हता. त्यांनी उत्कट हास्यानं मेहता यांचं स्वागत केलं आणि त्यांनी मागवलेलं लेनिन (Vladimir Lenin) यांचं “स्टेट अँड रिव्होल्यूशन (State and Revolution)” हे पुस्तक आणलं काय असा प्रश्न केला.
मेहता यांनी जसं त्यांना पुस्तक दिलं तसे ते पुस्तक वाचायला बसले. त्यांना माहिती होतं त्यांच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही आणि त्यांना ते पुस्तक वाचून संपवायचं होतं. वाचनावरची अशी पराकोटीची निष्ठा जगभर शोधून सापडायची नाही. मेहता निघून गेले आणि भगत सिंह यांना सांगण्यात आलं तुमची फाशी अलीकडे घेतली आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला फाशी देण्यात येईल. तोवर त्यांची थोडीथोडकीच पानं वाचून झालेली.
या प्रसंगाबद्दल भगत सिंहांचे निकटचे सहकारी श्री मन्मथनाथ गुप्त यांनी लिहून ठेवलं आहे,
जेव्हा फाशीचा तख्त तयार आहे हे सांगायला एक अधिकारी भगत सिंह यांच्याकडे आला तेंव्हा भगतसिंह लेनिन यांनी लिहिलेलं किंवा लेनिन यांच्यावर लिहिलेलं एक पुस्तक वाचत होते, भगत सिंह यांनी त्यांचं वाचन चालू ठेवलं आणि दृढतम् आवाजात म्हणाले,
“काही काळ प्रतीक्षा करा. एक क्रांतिकारी दुसऱ्या क्रांतिकारकाची (पुस्तकातून) गळाभेट घेत आहे.”
त्यांच्या त्या आवाजात काहीतरी विशेष होतं, तो मृत्यूचा संदेश घेऊन आलेला अधिकारीही काही काळ संमोहित झाला. भगतसिंह वाचत राहिले. काही क्षणांनंतर त्यांनी ते पुस्तक छताच्या दिशेने भिरकावून दिलं आणि धीरगंभीर आवाजात गरजले,
“चला जाऊया.”