राजर्षी शाहू महाराज – सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन विशेष । जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांची आज जयंती. अस्पृश्य जातीतील गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून देऊन त्यांच्या हॉटेलातील चहा आवडीने पिणाऱ्या या राजाची जयंती “सामाजिक न्याय दिवस” म्हणून साजरी केली जाते. चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेऊन शाहू असे नाव ठेवले. फ्रेंच शिक्षक सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उदारमतवादी शिक्षणाचे धडे “धारवाड” ला गिरविले आणि त्यानंतर भारतभर प्रवास केला. २ एप्रिल १८९૪ रोजी जनतेचे कल्याण करण्यासाठी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादिवर विराजमान झाले. पुढील २८ वर्षाच्या राज्य कारभारात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले .

टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या चुलत बहिणी चा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलाशी लावून दिला. मराठा राजघराण्यातील मुलीचा विवाह त्यांनी धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आला. आंतरजातीय विवाहासाठी स्वतःच्या घरून होणारा विरोध त्यांनी धुडकावून लावला. पुढे कोल्हापूर आणि इंदोर संस्थानात मराठा – धनगर आंतरजातीय विवाहाची योजना आखून २५ आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी त्या काळी लावून दिले. मित्रहो, आजही या शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्यास खून केला जातो , वाळीत टाकले जाते. शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नाहीत तर जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक देखील आहेत हे आपण लक्षात घेतले. आजही जातीव्यवस्था टिकून असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्याव लागत आहे ही मोठी दुर्देवाची गोष्ट आहे.

समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला. या कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशा पालकांना १ रुपये दंडाची शिक्षा केली . मागासलेल्या जातींना विकासाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० % आरक्षणाची तरतूद केली. विविध तत्कालीन परिस्थिती मध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती ( उदा.पारधी समाज) चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत होत्या.

सनातनी व्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेऊन त्यांना सत्ता आणि संपत्ती चा अधिकार नाकारला होता त्यामुळे त्यांच्यावर नैराश्यातून अशी कृत्ये करण्याची वेळ आली होती ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारून त्यांना गावकामगाराकडे रोज हजेरी लावण्याचा नियम केला होता . शाहू महाराजांनी ही हजेरी पद्धत रद्द केली आणि या जमातीतील लोकांना संस्थानात नौकऱ्या दिल्या. वणवण भटकणाऱ्या या लोकांना त्यांनी घरे बांधून दिली त्यांच्या पोटा पाण्याची सोय करून दिली त्यामुळे गुन्हेगार असा शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.” गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल मात्र त्यांना प्रेमाने मायेने आपलेसे करून सामाजिक दर्जा मिळवून देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळच “.

१८९९ साली कोल्हापूरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला . कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र लेखले. राजालाच जर अशी वागणूक मिळत असेल तर प्रजेच काय? असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला. वैयक्तीक अपमानाकडे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून बघणारा हा राजा होता. याचा परिणाम म्हणजे महाराजांनी कुलकर्णी – महार वतने रद्द केली . शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या विचाराकडे वळाले . शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शाहू महाराजांनी बहुजनांमध्ये शिक्षण प्रसाराची चळवळ सुरू केली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे काढली. गाव तिथे शाळा काढली.

राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाकडे लक्ष दिले नाही तर उद्योग, कला,व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. १९०६ साली महाराजांनी शाहू स्पिनींग अँड व्हॅविंग मिल ची स्थापना केली , १९१२ ला खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले , शाहूपुरी ही गुळाची बाजार पेठ वसविली , सहकारी कायदा करून सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिले, शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी भोगावती नदीवर जगातील मातीचे पहिले धरण बांधले असा हा सर्वांगीण विकास साधणारा दूरदृष्टी असणारा राजा.

महात्मा फुले यांनी सुरु केलेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ शाहू महाराजांनी पुढे यशस्वी पणे चालू ठेवली. शाहू महाराजांनी पुढे या चळवळी चा वारसा योग्य अशा व्यक्तीकडे सुपूर्द केली त्या व्यक्तीने पुढे देशाची राज्यघटना निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले ती व्यक्ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. १९१९ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी‘ मिळाला आहे असे सांगितले.

१९१९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी‘ पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

मित्रहो, शाहू महाराजांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून, शिक्षण प्रसार करून खूप मोठे काम केले पण आपण त्यांचे विचार अंगिकारतो आहोत का? हा आज खरा प्रश्न आहे. त्यांचे विचार महाराष्ट्राला समजले असते तर भीमा कोरेगाव सारख्या जातीय दंगली महाराष्ट्रात घडल्या नसत्या.आंतरजातीय विवाह केल्यास खून झाले नसते. आजही आपण आडनावा वरूनच एकमेकांच्या जातीचा शोध घेतोय हे वास्तव आहे. हुंड्या सारखी महिलांवर अन्याय करणारी प्रथा आपण जोपासतोय. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील रुद्रवाडी मध्ये दलित सवर्ण असा वाद झाल्यामुळे २૪ कुटुंबाना त्यांच गाव सोडाव लागलं. मातंग समाजातील लोकांनी मंदिरात प्रवेश केल्यामुळे त्यांना वाळीत टाकण्यात आलं अशा घटना शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात घडत आहेत. सरकार अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. शाहू महाराजांइतके योगदान आपल्याला देता येणार नाही पण मनामनात रुजलेल्या या जातीच्या भिंती पाडून शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे आचरण आपल्याला नक्की करता येईल.

मयूर डुमने
७७७५९५७१५०
(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत)

You might also like