कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी
कराड:- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीत कोळे (ता. कराड) येथील शकीला अमिन शेख या विद्यार्थिनीची बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (बीएसएफ) येथे निवड झाली आहे. बीएसएफ या खात्यासाठी महाराष्ट्रातून 45 विद्यार्थिनींची निवड झाली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजामधील पहिली शकीला शेख बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होणारी विद्यार्थिनी आहे.
शकीला शेख ही सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी असून तिचे वडील आमीन शेख हे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपली मुलगी शकीलाचे बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील अमीर यांचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. शकीला शेख हिचे बीएससी पर्यंतचे शिक्षण कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात झाले आहे. तर विद्यालयीन शिक्षण कोळे येथील श्री संत घाडगेनाथ हायस्कूल येथे झाले आहे.
प्रथमपासून मला देशसेवा करण्याची उर्मी व आवड असल्यामुळे सामान्य परिस्थितीतही आपण यातून मार्ग काढून बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये दाखल व्हायचे असे मी स्वप्न पाहिले होते. ते आज सत्यात उतरल्याचा मला मनस्वी आनंद होत असल्याचे मनोगत शकिला शेख हिने व्यक्त केले आहे. मनाशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अपार कष्ट केले तर ते प्रत्यक्ष अनुभवायला येतात, याचा मी अनुभव घेतल्याचेही शकीला शेखने सांगितले.
22 मार्च रोजी शकीला शेख हिचा वाढदिवस असल्याने व बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये यश मिळवल्याबद्दल कोळे ग्रामपंचायतीच्यावतीने शकीला शेखचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कोळे गावात राहुन शकीला शेख हिने मिळवलेले यश हे अभिमानास्पद असून कोळे गावाचा लौकिक वाढविला आहे.अशी प्रतिक्रिया सौ. सरपंच संगीता कराळे यांनी व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच श्री.समाधान शिंनगारे, सदस्य श्री.अर्जुन कराळे, श्री.सुधीर कांबळे, सौ.लतिफा फकीर, सौ.भाग्यश्री देसाई, ग्राम विकास अधिकारी श्री.सतीश माने, श्री.राजकुमार कराळे, श्री.खाशाबा देशमुख, श्री.सुरेश देसाई उपस्थित होते. प्रारंभी श्री.कुमार शिंदे यांनी प्रस्ताविक केले व शेवटी आभार मानले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा