पाटण | स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासोबत आमचेही कौटुंबिक संबंध होते. परंतु आमची निष्ठा केवळ ठाकरे कुटुंब व शिवसेनेसोबत आहे. मागील काही दिवसात आमच्यावरही अन्याय झाला. माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी माझ्याही अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. त्यानंतर मलाही पदावरून दूर करण्यात आले, मात्र आम्ही आमची पक्षासोबत असणारी निष्ठा ढळू दिली नाही. पुन्हा माझ्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवून जिल्हाप्रमुख पदी माझी निवड केली असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल कदम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
शासकीय विश्रामगृह पाटण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील, राजेश चव्हाण, शहर प्रमुख शंकर कुंभार, महादेव खेरमोडे, उपतालुका प्रमुख बापू पैलवान, राजाराम कोळेकर, शामराव सावंत, सचिन मोहिते, बाळासाहेब शिंदे, सिताराम कदम, राजेंद्र पाटणकर, सतीश कुंभार यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
हर्षल कदम म्हणाले, राज्यात शिवसेनेला सध्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. शिवसेनेने ज्यांना पद दिली, प्रतिष्ठा दिली, मानसन्मान दिला, तीच लोक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप करून शिवसेनेला सोडून गेले आहेत. परंतु पाटण तालुक्यात निष्ठावान शिवसैनिक आजही शिवसेने सोबतच आहे, याच निष्ठावक्तांना सोबत घेऊन पाटण तालुक्यात शिवसेना भक्कम करणार आहे. राज्यातील घडामोडी पाहता शिवसेना हा पक्ष संपणार पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांना असामान्य पदांपर्यंत शिवसेना पक्षाने त्याना संधी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर कितीही अडचणी आल्या, कोणीही कुठेही गेले तरी काहीही फरक पडणार नाही. निष्ठावान शिवसैनिक कायम पक्ष म्हणून प्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेने सोबतच असून भविष्यात निवडणुकांच्या माध्यमातून आम्ही आमची ताकद तालुक्यात दाखवून देऊ.
आगामी निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावरच लढणार
आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिल्हा तसेच तालुक्यांमध्ये आम्ही शिवसेनेची ताकद दाखवून दाखवू. जो निष्ठावंत सैनिक आहे, त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात पक्ष चिन्हावर सर्व निवडणुका लढवणार आहोत. सत्तेत असताना निष्ठावंत शिवसैनिकांना पाटण तालुक्यात न्याय मिळाला नाही. परंतु हा शिवसैनिक अन्याय होतो, म्हणून इकडे तिकडे गेला नाही. त्यामुळे पाटण तालुक्यात शिवसेनेची ताकद मजबूत असून येणाऱ्या काळात ही ताकद दाखवून देऊ असे स्पष्टीकरण हर्षल कदम यांनी दिले.
आबा कोळेकर निष्ठावान शिवसैनिक
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात शिवसैनिकांची नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. पाटण तालुक्यातील कुसरुंड गावचे आबा कोळेकर यांची नाराजीची क्लिप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐकली व त्यांनी आम्हाला आदेश दिला, की या शिवसेनेला भेटायला बोलवा. त्यांच्या आदेशाने आबा कोळेकर यांना माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवली. त्यावेळी शाब्बासकीची थाप निष्ठावान शिवसैनिक आबा कोळेकर यांच्या पाठीवर पक्षप्रमुखांनी दिली. हा खरा निष्ठावान शिवसैनिकांच बहुमान असून आबा कोळेकर हे निष्ठावान शिवसैनिक आहेत, असेही हर्षद कदम यांनी सांगितले.