अहमदनगर मध्ये लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय कुरघोडींचे प्रमाण वाढले अाहे. माजी आमदार शंकराव गडाख यांच्या घराची शुक्रवारी पोलीसांनी तपासणी केली. पोलिसांकडून करण्यात आलेली सदर झाडाझडती राजकिय कुरघोडीचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे.
माजी आमदार शंकराव गडाख यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी प्रश्नांवर नगर औरंगाबाद रोड येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी रस्ता रोको करून वाहने अडवल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याप्रकरणी सध्या न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहेत. शंकराव गडाख यांना उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने वॉरंट काढले होते. हे वॉरंट घेऊन पोलीस गेले असता एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पूर्ण घराची तपासणी पोलिसांनी केली.
शंकराव गडाख हे माजी आमदार आहेत तर त्यांचे वडील यशवंतराव गडाख हे माजी खासदार आहेत. गडाख कुटुंबीयाना सामाजिक आणि राजकीय वलय असताना पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे घराची तपासणी करणे हे राजकीय कारस्थानाचा भाग समजलं जात आहे. राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा प्रकार केला गेला असल्याचं शंकराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी सांगितलं.