सरकारवर विश्वास ठेवा अन् कामावर या; शरद पवारांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून विलीनीकरणाच्या मागणीवरून महाराष्ट्र्भर संप केला जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, परिवहनमंत्री अनिल परब आणि एसटीच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यानंतर शरद पवार यांनी “कर्मचाऱ्यांनी संप न करता एसटी पूर्वपदावर आणावी तुमच्या सर्व मागण्या या मान्य होतील. सरकारवर विश्वास ठेवा आणि परत कामावर हजर व्हावे, असे आवाहन पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार म्हणाले की, आज एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीसोबत बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. गेली दोन महिने एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप करण्यात आला. आम्ही आजच्या बैठकीत अनेक मुद्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. कामगारांनी जनतेला वेठीस धरू नये कामावर परत यावे. एसटी पूर्वपदावर आणावी तुमच्या सर्व मागण्या या मान्य होतील. सरकारवर विश्वास ठेवा आणि परत कामावर हजर व्हा.

आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यामुळे दोन महिने संप मिटण्यासाठी लागले. आता कर्मचाऱ्यांची आपला संप मागे घ्यावा. आज झालेल्या बैठकीत सर्व संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. त्यात विलीनीकरणाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. मात्र, विलीनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर आता बोलणे योग्य होणार नाही.

यावेळी मंत्री परब म्हणाले की, एसटी कामगारांना कामावर परत यावे. संप करून जनतेला वेठीस धरू नये. विलीनीकरणाचा मुद्दा हा न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. एसटी कामगारांनी संप करून जनतेला वेठीस धरू नये. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, असे आवाहनही यावेळी मंत्री परब यांनी केले.