Wednesday, February 8, 2023

पवार साहेब तेव्हा खोटे बोलले होते!

- Advertisement -

किस्से राजकारण्यांचे | कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान सध्या वाद सुरू आहे. कनसेचा नेता भीमाशंकर पाटील याने ‘सिमाप्रश्नासाठी लढणाऱ्या नेत्याना गोळ्या घातल्या पाहिजेत.’असे उर्मट विधान करून स्वतःभोवती सगळा कर्नाटकी मीडियाचा झोत वळवून घेतला आहे. त्याचवेळी त्याला सीमाभाग आणि महाराष्ट्रातील जनतेकडून जोरदार उत्तर दिले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाद सुरू झाल्यावर काही वर्षांपूर्वी सिमाभागातील कन्नड सक्तीच्या विरोधात जेष्ठ नेते शरद पवार यांनी एक आंदोलन केले होते.त्या आंदोलनात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पवारांचे अनेक सहकारी सहभागी होते.

बेळगाव येथे हे आंदोलन होणार होते मात्र या आंदोलनाला शरद पवारच काय पण महाराष्ट्रातील पक्षीही येणार नाही असे तत्कालीन कर्नाटकी राज्यकर्त्यांनी सांगितले होते. मात्र आडमार्गाने एका कोळश्याच्या ट्रकमधून साध्या शेतकऱ्याच्या वेशात शरद पवार कर्नाटकात पोहोचले होते. हा ट्रक सांगली जवळच्या हरिपूर या गावचा होता आणि या ट्रकमध्ये सांगली जिल्ह्यातील कोतवडे गावचे सुरेश यादव होते. त्यांनीच मला या आंदोलनाची माहिती दिली.

- Advertisement -

ते म्हणाले,”संपत,आंदोलनाच्या रात्री शरद पवार बेळगावात पोहोचले. त्याच्या अगोदर दोन दिवस ते अज्ञातवासात असल्याच्या बातम्या येत होत्या. कर्नाटकातील प्रशासन बुचकळ्यात पडले होते. त्याच वेळी वेगवेगळ्या मार्गाने शेकडो लोक बेळगावच्या आसपासच्या गावात पाहुण्याच्या रुपात राहिले होते. सगळ्यांनी मिळून सकाळी दहा वाजता राणी चौकात जमायचे होते. सकाळी दहा वाजता ठरल्याप्रमाणे सगळे लोक पोहोचले. शिट्टी वाजली की शरद पवार यांनी यायचं अस ठरलेलं. मग शिट्टी वाजली आणि ते आले. आंदोलन सुरू झालं. महाराष्ट्रातील लोकांना बघताच कर्नाटकी पोलीस बिथरले. त्यांनी लाठीमार सुरू केला. लोकांच्या बरोबर शरद पवार यांनाही पाठीवर मार बसला. धोंडिराम मोहिते यांच्या कानाला मार बसल्याने कान फुटला. मग आम्हा सगळयांना अटक करून नेले. काही वेळाने पत्रकार आले. पत्रकार आल्यावर मी त्यांना सांगायला लागलो. ‘आम्हाला पोलिसांनी मारले. साहेबांनाही मारले. ‘ते ऐकताच साहेब माझ्यावर ओरडले”चूप…” साहेब लगेच पत्रकारांना म्हणाले “मला मारहाण झालेली नाही. आमची काही तक्रार नाही.”

सुरेश यादव यांच्याकडून मी हा प्रसंग अनेकदा ऐकला आहे. ‘पोलिसांनी लाठीमार करूनही पवारांनी मला मारलेल नाही असं का सांगितलं? ते खोटे का बोलले. कारण ते खरे बोलले असते तर महाराष्ट्रात असणारे कर्नाटकचे लोक, हॉटेल व्यवसायिक, परिवहन महामंडळाच्या गाड्या, त्यातील प्रवाशी यांच्यावर हल्ले झाले असते. आज त्यांची एवढी क्रेझ आहे. तेव्हा तर ते तरुण होते. महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत होते. आपल्याला मारहाण झालेलं महाराष्ट्रात समजलं तर अनर्थ होईल. तो टाळावा म्हणून पवार साहेब शांत बसले. पाठीवर लाठीचे तडाखे बसूनही हा माणूस म्हणाला, “मला कोणीही मारलेलं नाही. माझी कसलीही तक्रार नाही.”
– संपत मोरे
8208044298