करमाळा विधानसभा निवडणुकीत संजय शिंदेंना घेरण्यासाठी शरद पवार डाव टाकणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागराज मंजुळेच्या सैराटमध्ये ओबडधोबड आणि रांगड्या मातीतल्या प्रेमळ माणसांचा करमाळा आपल्याला बघायला मिळाला… करमाळ्याची (Karmala Assembly Election 2024) माणसं ही साधीसुधी असली तर इथलं राजकारण मात्र भयानक गुंतागुंतीचं आणि भल्याभल्यांना पाणी पाजणारं आहे… इथल्या आमदारांपासून ते स्थानिक नेत्यांनी एका मागून एक इतके पक्ष बदललेत की ते पाहून तुमचेही डोकं गरगरल्याशिवाय राहणार नाही… सध्या या करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत संजय मामा शिंदे… व्हिडिओ बनेपर्यंत तरी अजित पवार गटात असणाऱ्या संजय मामांची (Sanjay Shinde) आमदारकी येणाऱ्या टर्मला धोक्यात आलीय? करमाळ्याच्या राजकारणात याच संजय मामांना पाणी पाजत किंगमेकर कोण ठरू शकतं? करमाळ्याचा 2024 चा आमदार कोण? संजयमामा शिंदे पुन्हा एकदा आमदार झालेच, तर त्यांना प्लसमध्ये ठेवणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणकोणत्या असू शकतात? त्याचंच हे विश्लेषण…

सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर सध्या विद्यमान आमदार म्हणून संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व आहे… अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा नेमका आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला पसंती देईल? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 2014 च्या राजकारणापासून इथली बदलती समीकरणे तपासून घ्यावी लागतात… करमाळ्याला तसं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जायचं… 2014 ला झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे नारायण आबा पाटील, राष्ट्रवादीकडून रश्मी बागल तर स्वाभिमानीकडून संजय मामा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते… अत्यंत अटीतटीचा झालेल्या करमाळ्याच्या 2014 च्या आमदारकीला गुलाल उधळला तो शिवसेनेच्या नारायणा आबा पाटलांनी…पण अवघ्या 357 मतांच्या लिडने हा विजय पदरात पडल्यामुळे 2019 साठी प्रत्येकानेच तगडी तयारी सुरू केली होती…

YouTube video player

रश्मी बागल या राष्ट्रवादीतील तालुक्यातील महत्त्वाच्या चेहऱ्याने तानाजी सावंतांच्या मदतीने शिवसेनेचं शिवबंधन हाती घेत 2019 ला उमेदवारीही मिळवली… तर 2014 नंतर स्वाभिमानीचा हात सोडत जिल्हा परिषदेसाठी भाजपचा हात सोबत घेणाऱ्या संजय मामा शिंदेंनी लोकसभेसाठी घड्याळाच्या चिन्हावर माढातून अपयशी फाईट दिली होती…तरीदेखील राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याची त्यांना गळ घालण्यात आली होती.. पण लोकसभेला पराभवाचा चटका बसल्याने संजमामांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला… त्यामुळे राष्ट्रवादीने अधिकृतरित्या संजय पाटील घाटणेकर यांना तिकीट देऊ केलं… मात्र नंतर पवारांनी संजय मामांच्या पाठीशी ताकद लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे घाटणेकर आपोआपच शर्यतीतून बाहेर फेकले गेले ..पण तत्कालीन स्टॅंडिंग खासदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्याने नारायण पाटलांनी इथून अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला…एकूणच अपक्ष म्हणून संजय मामा शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या रश्मी बागल अशी इथली लढत झाली… आणि साडेपाच हजाराच्या लीडने का होईना पण संजय मामा शिंदेंनी आमदारकी खेचून आणली…

तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या संजय मामांनी निकालानंतर राजकीय गणित पाहून भाजपाला पाठिंबा दिला होता…पण पुन्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोबतच राहणं पसंत केलं…त्यांच्या मधल्या राजकीय भूमिका या सतत बदलत्या राहिल्या तरी अजित दादांना त्यांचा कायम सपोर्ट राहिला… त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीपासून ते अजित पवार गटात आहेत… मतदारसंघात केलेली काम, स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी पकड आणि सोशल कनेक्ट तगडा असल्याने संजय मामा करमाळ्याच्या राजकारणात नेहमी प्लसमध्ये राहतात… त्यात मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणूनही संजय मामा शिंदेंची ओळख आहे… मतदारसंघातील जुने हेवेदावे विसरून त्यांनी लोकसभेला एकदिलाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला होता… त्यामुळे महायुतीकडून सध्या तरी त्यांच्याच नावाचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो… दुसरीकडे शिवसेनेकडून दोन नंबरची मतं मिळवणाऱ्या रश्मी बागल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने संजय मामांचा किमान एक अडथळा दूर झाला आहे…तर राहिला प्रश्न तो केवळ नारायण पाटील यांचा… तर शरद पवार गटाची तुतारी हाती घेत तालुक्यात नारायण पाटलांनी लोकसभेला मोहिते पाटलांच्या पाठीशी बरीच ताकद लावली… त्याचंच फळ म्हणून त्यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं… त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा ज्या काही मोजक्या लढती महाराष्ट्रात बघायला मिळतील. त्यात करमाळ्याचंही नाव ऍड होईल, असं सध्याचे चित्र आहे…

शरद पवार प्लस मोहिते पाटील अशी ताकद ही नारायण पाटलांच्या पाठीशी लागू शकते… लोकसभेच्या निकालाचा ट्रेंड पाहता यंदा करमाळ्याचंही वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूनेच झुकलेलं पाहायला मिळतंय…पण या मतदारसंघाला असणारी राजकीय चुरशीची परंपरा यंदाही कायम राहील, असं म्हणायला हरकत नाही… बाकी राजकारणातील निर्णायक क्षणी लोकसभेचा वचपा काढण्यासाठी मोहिते पाटील इथून काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे… बाकी तुम्हाला काय वाटतं? करमाळा विधानसभेचा 2024 चा संभाव्य आमदार कोण असेल? संजय मामा शिंदे आपल्या विजयाची परंपरा यापुढेही कायम राखू शकतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…