शरद पवार नावाचे राजकीय विद्यापीठ – संजय सोनटक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार हे नाव महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणात अपरीहार्यपणे  दखलपात्र आहे एवढा त्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे अर्थातच ही किमया एका दिवसात घडलेली नाही. शरद पवार नावाचा लेखाजोखा मांडणे आजच्या राजकीय परीस्थितीत अपरिहार्य आहे.

शरद पवारांच्या बाबतीत सकारात्मक चर्चांपेक्षा नकारात्मक चर्चा सातत्याने जीवंत ठेवण्यात काही लोक रस घेतात. शरद पवार या नावा भोवती सातत्याने संभ्रम कसा राहील याची तजवीज करत राहतात असे दिसते. शरद पवार म्हणजे भ्रष्टाचार असेही समीकरण सातत्याने रूजविणे हे अनेकांनी आपले जीवनकार्य मानलेले दिसते. शरद पवारांची खलनायकी प्रतीमा रंगविण्यात काही लोक कायम मश्गुल दिसतात. राजकीय विश्वासघात म्हणजे शरद पवार अशाही चर्चा राजकारणात सातत्याने चघळल्या जातात. राजकीय विश्वास म्हणजे काय हे मात्र कुणी सांगत नाही. राजकारणात विश्वास हा अतिशय परीस्थितीजन्य असतो.

शारदाबाई गोविंदराव पवार , आप्पासाहेब पवार , यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सार्वजनिक जीवनात वाढलेल्या शरद पवारांना कायमच नकारात्मक राजकारणाला तोंड द्यावे लागले असे दिसते. भारतीय जनमानसात राजकारण आणि राजकीय क्षेत्राबाबत , नेतृत्वाबाबत नकारात्मक बोलणे ही फँशन आहे. अजूनही फारशी राजकीय साक्षरता न रूजलेल्या आपल्या भारतीय समाजात राजकारणाचे लाभ घेत राजकारणाला अस्पृश्य ठरविणारा मोठा दांभिक वर्ग आपल्या देशात आहे. या वर्गाने या फँशन चा वापर करून शरद पवारांची प्रतिमा कलंकित करण्याचा वारेमाप प्रयत्न झालेला दिसतो. या सर्वांना उरून पुरत शरद पवार नावाचे राजकीय विद्यापीठ भारतीय राजकारणात आजही अतिशय ताकदीने उभे असलेले दिसते. याचा सकारात्मक आणि तटस्थपणे अभ्यास झाला पाहिजे.

शरद पवार आजही जिब्राल्टर प्रमाणे अनेक प्रहार सोसून उभे दिसतात. त्यांच्यातील सातत्याने कार्यरत राहण्याची उर्जेचे रहस्य काय असावे. राजकीय क्षेत्रातील त्यांचा वावर मला अतिशय व्यावहारिक आणि व्यावसायिक वाटतो. राजकीय जुगाड करण्यात त्यांचा हातखंडा दिसतो. सातत्याने नवनवीन आव्हाने पेलण्याची जिद्द दिसते. त्यांच्या नावाभोवती अविश्वासाचे वलय असूनही त्याला फाट्यावर मारून राजकीय जोडणी साठी ते सदैव तत्पर दिसतात. महत्त्वाचे म्हणजे या सर्व राजकीय कामात ते लोकांना विसरत नाहीत. लोकांना जोडणे आणि लक्षात ठेवणे ही अफाट क्षमता त्यांच्या कडे दिसते. मैत्री देखील जपतात. साहित्य, कला, क्रीडा,सहकार अशा क्षेत्रातही ते आपला दबदबा कायम राखत आपला वावर अगदी सहजपणे ठेवतात.

कुटुंब वत्सल शरद पवार कौटुंबिक जबाबदारी चे भान ठेवून जगतांना दिसतात. विवेकी प्रतिभेचे धनी असणारे शरद पवार कौटुंबिक संतुलन राखून वयाच्या ऐंशीव्या वर्षी सक्रीय राजकारण आणि समाजकारण करतात याला कारण व्यक्ती म्हणून जीवनाकडे आणि राजकारणाकडे अतिशय संयमित पणे पाहण्याची आणि जगण्याची त्यांची व्रुत्ती असे दिसते. कुठल्याही विषयावर ते अभ्यासपूर्ण बोलताना. म्हणूनच पवार घराण्यातील पुढील पिढीला आणि राजकीय क्षेत्रातील लोकांना ते मार्गदर्शक वाटतात.

सार्वजनिक जीवनात आरोप , टिका या गोष्टी अविभाज्य भाग आहेत. शरद पवार नावाची जादू या सर्वांना उरून पुरत राजकारण, सहकार,उद्योग, शेती, कला, क्रिडा या क्षेत्रात आपल्या समर्थकांना आणि विरोधकांना सांभाळून सुरू आहे हे कौतुकास्पद आहे. त्यांची राजकीय सार्वजनिक जीवनातील साठ वर्षे हा प्रबंधाचा विषय होऊ शकतो. राज्यशास्त्र ,समाजशास्त्र,समाजकार्य विद्यार्थ्यांनी शरद पवार नावाच्या विद्यापीठाचा चा अभ्यास केला पाहिजे.

शरद पवारांचा पिंड हा त्यांची आई शारदाबाईंकडून समाजवादी असला तरीही काँग्रेसच्या फ्रेम मधे ते अतिशय चपखल बसतात. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाची संधी हूकूनही आणि स्वताचा वेगळा राजकीय पक्ष काढूनही ते व्यापक काँग्रेसीच वाटतात. धोरणात्मक निर्णय घेतांना शेतीतील अनेक सकारात्मक बदल असो किंवा योजना कर्जमाफी, फळबाग योजना , फुलशेती , इस्रायली शेती चे प्रयोग असे प्रयोग ते शेती जीवनात आणतात. बारामती चे क्रुषिविज्ञान केंद्राला लाखो शेतकरी अभ्यास गटांनी भेटी देऊन मार्गदर्शन घेतले आहे.

मला शरद पवार सामाजिक उद्योजक वाटतात. शरद पवारांचे मूल्यमापन समाज आपापल्या परीने साधकबाधक पद्धतीने करत राहील. कौतुक, टिका, खिल्ली सर्वच करेल. खिल्ली उडवणे फारच सोपे असते. पण राजकीय आणि सार्वजनिक जीवनात काम करणार्यांनी (आपापल्या राजकीय मतभेदासह) शरद पवार हे व्यक्तीमत्व समजून घेणे आवश्यक आहे.

शरद पवार हे भारतीय राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील संचित आहे. शरद पवार साहेबांना असेच सक्रिय राहत उत्तम आरोग्यासह कार्यरत राहण्यासाठी मनापासून शुभेच्छा.

©लोकमित्र संजय का.सोनटक्के, लोकग्राम
9822469495

12 डिसेंबर 2020

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment