लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election) शरद पवार (Sharad Pawar) पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज स्वतः शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी, “मी निवडणूक लढवणार नाही” असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध केला आहे.

पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “राज्यातील प्रमुख नेत्यांवर ईडी सारख्या एजन्सीकडून कारवाई केली जात आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांवर आधी अशीच कारवाई केली. त्यांच्यावर आरोप करुन त्यांची चौकशी करुन तुरुंगात टाकले. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करुन त्यांना आता तुरुंगात टाकले आहे. (मोदी सरकारकडून) सत्येचा गैरवापर करणे सुरू आहे. आज चिंतेची अवस्था झाली आहे”

पुढे पत्रकारांकडून शरद पवारांना निवडणुक लढवण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना त्यांनी “आपण माढ्यातून तर नाहीच पण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही” अशी प्रतिक्रिया दिली. खरे तर, लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः शरद पवार पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवतील या चर्चेने जोर धरला होता. परंतु आता स्वतः शरद पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी असा निर्णय का घेतला असावा याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान, “माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तिक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ती मान्य केली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोक येतील. महायुतीच्या जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसे येतील. एकदा दुसऱ्या बाजूकडून उमेदवारांच्या निवडीचे निर्णय जाहीर झाले की हे इनकमिंगचे प्रमाण अधिक वाढलेले दिसेल” असे देखील शरद पवारांनी म्हणले.