मुंबई | सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजांच्या विरोधात शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी पॅटर्नवरती निवडणूक लढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली. तसेच पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्र पॅनेल उभे करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असा शब्द आपणांस दिल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.
आगामी सातारा पालिकेच्या निवडणूकी संदर्भात राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सातारा पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे पॅनेल टाकण्याबाबत तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन पालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी दीपक पवार यांनी व्यक्त केली.
यामध्ये सातारा पालिकेत पॅनेल टाकण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. दिपक पवार हे नेहमीच दोन्ही राजाच्या विरोधात आपली ताकद आजमावत आलेले आहेत. यश- अपयश यांची पर्वा न करता पवार व दोन्ही राजाच्यात अनेकदा निवडणुकीच्या लढाई झालेल्या आहेत. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविल्यास दोन्ही राजे काय भूमिका घेणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.