महाराष्ट्रात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू!! लेकीच्या विजयानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. निकालानुसार, बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा घवघवीत मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे सध्या बारामती जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. यासह शरद पवार गटाचे कार्यकर्ते गुलाल उधळत विजयाच्या घोषणा देताना दिसत आहे. या विजयानंतरच शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात सर्वात प्रथम त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहे.

शरद पवार काय म्हणाले??

सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. महाराष्ट्रात एक प्रकारची परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्रात निवडणुकीचा जो निकाल समोर आला आहे. तो इतर ठिकाणच्या परिवर्तनाला पोषक असा निकाल आहे. सुदैवाने देशपातळीवरचं चित्रही आशादायी आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये जे निकालाचे दावे केले जात होते, त्यापेक्षा वेगळा निकाल लागला आहे.”

त्याचबरोबर, “या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी भाजपाला उत्तर प्रदेश आणि इतर भागात जे यश मिळायचं, त्याचं मताधिक्य जास्त असायचं. पण आज त्यांना ज्या काही जागा मिळाल्यात, त्या मर्यादित अशा मताधिक्याने मिळाल्या आहेत. याचा अर्थ देश पातळीवर आम्ही व आमच्या सहकाऱ्यांनी अधिक लक्ष दिलं, तर आज उत्तरेकडचा चेहरा बदलायला अनुकूल चित्र दिसतंय. त्यासाठी आम्हा लोकांकडून काळजी घेतली जाईल” असे शरद पवार यांनी म्हणले आहे.