हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेल लावलेला पैलवान आता मैदानात उतरलाय… लोकसभेला 80 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केल्यानंतर आता विधानसभेला कोल्हापूर पासून ते इंदापूर पर्यंत… ते अगदी नगरमध्येही शरद पवार पायाला भिंगरी बांधून फिरतायत… आणि फक्त फिरतच नाही तर राजकारण तुतारीच्या बाजूने सेट करतायेत… शरद पवारांच्या नावाचा करिष्मा, त्यांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि पक्षात असणारा स्पेस पाहून प्रत्येकजण आमदार होण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ इच्छितोय… त्यासाठीचं इनकमिंग देखील सुरू झालय… या इनकमिंगच्या प्रोसेस मध्ये असलेल्या, किंवा इन्कमिंग झालेल्या पुढाऱ्यांच्या लिस्टची यादी मोठी असली तरी त्यातले पाच चेहरे असे आहेत की ज्यांच्या हातात तुतारी दिली, तर ते आरामात आमदार होतील… दुसऱ्या पक्षातून शरद पवारांच्या पक्षात इन्कमिंग झालेल्या आणि आमदार होण्याचे फिक्स चान्सेस असणाऱ्या या मोहऱ्यांच्या विरोधात महायुतीकढून रिंगणात नेमकं कोण असेल? स्वतः शरद पवारांनी टार्गेट केलेले हे हाय व्होल्टेज पाच मतदारसंघ नेमके आहेत तरी कोणते? त्याचीच ही इनसाईड स्टोरी…
भाजप पक्ष सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेऊन आमदार होण्याचे ज्यांचे चान्सेस वाढलेत असं नाव म्हणजे समरजीतसिंह घाटगे…कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याची घोषणा रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती… यानंतर या निर्णयाला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठी घाटगे नवा पर्याय शोधत होते… त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेऊन त्यांनी घड्याळ विरुद्ध तुतारी अशा फायनल संघर्षाची जणू घोषणाच देवून टाकली… जसं ८ वर्षं मी प्रामाणिकपणे काम केलं, तसंच शरद पवार व तुमच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करेन, असं बोलून त्यांनी कागलच्या निवडणुकीत मोठी रंगत आणलीये… देवेंद्र फडणवीसांचा विश्वासू राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या घाटगे यांना आपल्या गोटात घेऊन मुश्रीफांशी पंगा घ्यायचाच अशा आक्रमक भूमिकेत सध्या शरद पवार असल्याचं दिसतं… त्यामुळे मुश्रीफांशी सतत कडवा संघर्ष करूनही आमदारकी पदरात न पडलेल्या समरजीतसिंह घाटगे यांना तुतारी तारणार का? हे पाहावं लागेल…
शरद पवार गटात इनकमिंग होण्याची शक्यता असणार दुसरं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील….सहकार क्षेत्रातील धुरीण, पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ मंत्री म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा एक पाय भाजपात तर दुसरा राष्ट्रवादी शरद पवार गटात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे… इंदापूरवर एकहाती कंट्रोल ठेवणाऱ्या हर्षवर्धन पाटील अजित पवार गटाच्या दत्ता भरणे यांनी 2014 च्या निवडणुकीत पराभवाचा दणका दिला… हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी अजित पवार नेहमीच दत्ता भरणे यांना बळ देत आले… म्हणूनच आता आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी शरद पवारांची बंद दाराआड भेट घेतली… शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती, हर्षवर्धन पाटील यांनी २० वर्षांत मंत्री म्हणून केलेले काम, त्यांचं स्थानिक राजकारणावर विशेषत: सहकारावर असलेला दबदबा हे सगळं जोडून पाहिलं तर शरद पवारांच्या तुतारी या चिन्हावर ते अजितदादांचे कट्टर समर्थक दत्तामामा भरणे यांचा आरामात कार्यक्रम करू शकतात…
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेणारा तिसरा मोहरा म्हणजे वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे मदन भोसले… राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांना अनेकदा आव्हान देऊनही मदन भोसले यांच्या पारड्यात कधीच यश पडलं नाही… सध्या भाजपात राहून ते आमदारकीसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते… मात्र विद्यमान आमदार मकरंद पाटीलच अजित दादांच्या सोबतीने महायुतीत येऊन बसल्याने भोसलेंची राजकीय अस्वस्थता वाढली होती… त्यात त्यांनी नुकतीच जयंत पाटलांची भेट घेऊन आपण तुतारी हातात घेणार असल्याचं क्लियर करून टाकलंय… लोकसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातून तुतारीला मिळालेल लीड पाहता अनेक इच्छुकांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत… मात्र मदन पाटील यांच्या तोडीस तोड चेहरा पक्षात घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तयारी करून असावेत… म्हणूनच पाटलांच्या विरोधातील नेहमीचे प्रतिस्पर्धी आणि माजी आमदार मदन भोसले यांनाच राष्ट्रवादीकडून गळ घातली जातीये… लोकसभेला वाई मतदारसंघाने तुतारीला दिलेलं लीड, शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती, कडवा शिवसैनिक, मदन भोसले यांची कारखानदारी आणि संस्थात्मक ताकद हे सगळं विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना अडचणीत आणणार आहे, एवढं मात्र नक्की… मदन भोसले यांना तुतारी फुंकण्यासाठी शरद पवार वाईत भोसलेंना नेमकी ताकद कशी पुरवतील, हे पाहणं मात्र महत्त्वाचा असणार आहे…
राष्ट्रवादी शरद पवार गटाने इतर पक्षातून इन्कमिंग करताना नगर जिल्ह्यालाही सोडलं नाही त्यातलंच एका भल्या मोठ्या राजकीय प्रस्थाला तुतारीची ओढ लागलीय ते नाव म्हणजे विवेक कोल्हे यांचं….आणि राजकीय वर्तुळात चर्चांच्या वावड्या उठू लागल्या… खरंतर कोपरगावमधील कोल्हे आणि काळे यांच्यातला राजकीय संघर्ष हा तसा जुनाच… तो आता तिसऱ्या पिढीपर्यंत जाऊन पोहोचलाय… विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ देत मोठी खेळी केली… यामुळे भाजपात असणाऱ्या आणि यंदा हमखास आमदारकीच्या रिंगणात दिसणाऱ्या विवेक कोल्हे यांची सध्या मोठी कोंडी झाली होती… त्यामुळे त्यांनी आता आमदार साहेबांना टशन देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेण्यावर भर दिलाय… त्यांचा शरदचंद्र पवार पक्षातील ऑफिशियल पक्षप्रवेश किंवा तशी घोषणा अद्याप झाली नसली तरी काळेंना पारंपारिक लढत देण्यासाठी त्यांना शरद पवारांच्या बॅक सपोर्टची मोठी मदत होणार आहे, एवढं मात्र नक्की…
आता या यादीतलं पाचवं आणि शेवटचं नाव येतं ते ए. वाय. पाटील यांचं…राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीसीसी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव पाटील उर्फ ए. वाय. पाटील यांनी केव्हाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला होता… इतकंच काय तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शाहू छत्रपती महाराजांचा प्रचार केला होता… प्रचारात ते सर्वाधिक ऍक्टिव्ह देखील होते… कोल्हापुरातील राधानगरी विधानसभेची जागा शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर यांना जाणार यावर फक्त कन्फर्मेशनच येणं बाकी आहे… त्यामुळे ए. वाय. पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणाची पुढची पावलं ओळखत आदी महाविकास आघाडीची कड घेतली… आणि आता शरद पवार यांच्यासोबतचा त्यांचा संपर्क देखील वाढला आहे… हे सगळं सांगून जातं की येणाऱ्या काळात राधानगरीच्या जागेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ए. वाय. पाटील शिंदे गटाच्या आबिटकरांच्या विरोधात निर्णायक लढत देतील… तर अशी होती शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर आगामी विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकून विजयाचे चान्सेस असणारे पाच शिलेदार…