शरद पवार आज, उद्या साताऱ्यात ; दोन दिवसीय दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खा. शरद पवार हे आज व उद्या असे दोन दिवस सातारा दौऱ्यावर येत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवार, दि. 8 व सोमवार, दि. 9 मे रोजी ते सातार्‍यात मुक्कामी असून या दोन दिवसांतील घडामोडींबाबत राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे.

शरद पवार यांचा सातारा दौरा नेहमीच लक्षवेधी ठरला आहे. रविवारीही ते सातार्‍यात शासकीय विश्रामगृहावर मुक्कामी असल्याने राजकीय खलबते होण्याची चिन्हे आहेत. आज (रविवारी) दुपारी 1 वाजता ते वाहनाने पुण्याहून निघणार असून 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पोहोचणार आहेत. दुपारी 3 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यासमवेत त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांचा कोणताही कार्यक्रम नियोजित नसून शासकीय विश्रामगृह येथे रात्री मुक्काम आहे.

सोमवार, दि. 9 रोजी सकाळी 8 वाजता खा. शरद पवार हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. 9 वाजता पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11 वाजता रयत मॅनेजिंग कौन्सलिंग बैठक, दुपारी 1 ते 1.30 राखीव, दुपारी 2 वाजता जकातवाडी येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्यास ते उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता वाहनाने कोल्हापूरला रवाना होणार आहेत. खा. पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहराज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अन्य राष्ट्रवादीचे नेते रविवारी सातार्‍यात मुक्कामी येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यातच भाजपचे मदन भोसले यांची सत्ता असलेला किसनवीर सहकारी साखर कारखाना आ. मकरंद पाटील यांनी 21-0 ने ताब्यात घेतला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सातारा दौर्‍याकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment