शरद पवारांच्या घरावर दगडफेक? विश्वास नांगरे-पाटलांची घटनास्थळी धाव

मुंबई : राज्य सरकारनंतर मुंबई उच्च न्यायालयातही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत निराशा झाल्याने आज एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोणतीही कल्पना नसताना एसटी आंदोलक दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर मोठ्या संख्येने धडकले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये आंदोलनाने आक्रमक रुप धारण केले. आंदोलकांकडून दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

त्यामुळे सिल्व्हर ओक परिसरात तणाव निर्माण झाल्याने सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटीलही याठिकाणी दाखल झाले. विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणत आंदोलकांना पांगवण्यात यश मिळवलं. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यादेखील आंदोलकांना सामोऱ्या गेल्या. मात्र सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतरही आंदोलक ऐकायला तयार नव्हते.

आमच्यावर दगडफेक करून किंवा चपला फेकून प्रश्न सुटणार नाहीत. आंदोलकांनी शांततेने चर्चा करावी, मी या क्षणी तुमच्याशी बोलायला तयार आहे. माझे आई-वडील आणि मुलगी घरात आहे. प्रथम त्यांच्या सुरक्षिततेची मला खात्री करू द्या. तुम्ही शात झाल्यास मी चर्चा करायला तयार आहे, असं सुप्रिया सुळे या वारवंवार सांगत होत्या, मात्र आंदोलक नरमाईची भूमिका घेण्याच्या स्थितीत नव्हते.दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.