राष्ट्रवादी नेत्यांची पवारांनी बोलावली बैठक, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । भाजप-शिवसेनेने अद्याप सरकार स्थापन केलेलं नाही. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांत जोरदार संघर्ष सुरू आहे. खोटं बोलणाऱ्यांसोबत मी चर्चा करणार नाही. अशी भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. त्यामुळ महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. याच सत्तास्थापनेच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार यांच्याशी शरद पवार १२ तारखेला सत्तास्थापनेच्या तिढ्यावर चर्चा करणार आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती कळत आहे. काल काँग्रेस नेत्यांशी शरद पवार यांनी चर्चा केली होती. त्यानंतर आम्ही राज्यपालांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून आहोत, असं आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, पुण्यात शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकत्रित फोटो लागले आहेत. त्यामुळे शरद पवार शिवसेनेसोबत जाण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment