पुणे प्रतिनिधी | एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल पुणे पोलिसांनी काही जणांवर शहरी नक्षलवादाच्या नावाखाली अटक करत त्यांच्यावर देशद्रोहाचा घटला भरला होता. मात्र सदर कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर असून त्याबाबत एस.आय.टी. कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
यावेळी एल्गार परिषदेतील भाषणांवरुन त्यांना देशद्रोही ठरवणे हा सत्तेचा गैरवापर असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. सत्तेचा गैरवापर करुन साहित्यिकांवर देशद्रोहाचा घटला चालवणे चुकीचे आहे. सुधा भारद्वाज, महेश राऊत हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असे पवार म्हणालेत. एल्गार परिषदेत सादर केलेल्या कवितांवरुन कोणालाही देशद्रोही ठरवता येणार नाही. लोकशाहीत टोकाची मते मांडण्याचे स्वातंत्र्य असते. एल्गार परिषदेबाबतचे पुणे पोलिसांचे वागणे आक्षेपार्ह असून सदर अधिकार्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असंही पवार म्हणालेत.
पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर करुन कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकलेले आहे. पुणे पोलिसांनी मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली. दलित समाजासाठी योगदान देणार्या साहित्यिकांवर कारवाई करण्यात आली. आता सरकारणे सदर प्रकरणाची चौकशी करुन वस्तुस्थिती समाजासमोर आणावी असे पवार यांनी म्हटलंय.