हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सज्ज झाली असून शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात योग्य समन्वय पाहायला मिळत आहे. मात्र मुख्यमंत्रीपदावरून तिन्ही पक्षाचे अद्याप एकमत झालेलं नाही. एकीकडे निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे जाहीर करा अशी मागणी उद्धव ठाकरे करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांनी अजूनही सावध भूमिका घेत मुख्यमंत्रीपदाबाबत थेट भाष्य केलेलं नाही. आता खुद्द शरद पवारांना (Sharad Pawar) याबाबत विचारलं असता पवारांनी मुरब्बीपणे या प्रश्नाचे उत्तर दिले.
शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार म्हणाले, आताच मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करावं असा आमचा आग्रह नाही. सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचं उद्दीष्ट हे स्थिर सरकार देण्याला असेल, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आताच चेहरा देण्याची गरज वाटत नाही, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री कोण ते ठरवलं जाईल असं उत्तर शरद पवारांनी दिले. याचाच अर्थ विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्याच पक्षाकडे मुख्यमंत्रीपद जाईल हे पवारांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शिवरायांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा वाऱ्याच्या वेगामुळे कोसळला असा तर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला होता, त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, वाऱ्याच्या वेगामुळे किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असं कारण मुख्यमंत्री आणि बाकीचे लोक सांगत आहेत. पण अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे आहेत.मुंबईत इंडिया गेटच्याजवळ, समुद्रकिनारी जो पुतळा आहे तो कित्येक वर्षांपासून उभा आहे, त्याला काही झालेलं नाही. त्यामुळे मालवणमध्ये जो पुतळा कोसळला,त्याबाबत जी कारण सांगितली जात आहेत, ती योग्य आहेत असं दिसंत नाही, असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. तसेच त्या पुतळ्याचं काम ज्यांनी काम केलं त्यांचा या क्षेत्रातील अनुभव अत्यंत मर्यादित होता, तेवढं मोठं काम त्यांनी केलेलं नाही असं दिसतंय. हे असताना त्यांच्यावर जबाबदारी टाकल्यानं अपघात घडेल अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, असं शरद पवार म्हणाले.