हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा रंगली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण देत राजू शेट्टी यांचे नाव वगळले नसल्याचे सांगितले.
शरद पवार म्हणाले, राजू शेट्टी नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही.
पवार पुढे म्हणाले, एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय’, असं शरद पवार म्हणाले.