हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सुभेदार आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात येऊन केली होती. त्यावर आज पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे, मला भ्रष्टाचाराचा सुभेदार म्हणणारे स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले होते असा सणसणीत टोला शरद पवार यांनी अमित शाह याना लगावला. शेषराव चव्हाण लिखित ‘पद्मविभूषण शरद पवार – द ग्रेट एनिग्मा’ या पुस्तकाच्या डॉ. मकदूम फारुकी यांनी केलेल्या उर्दू अनुवादाचे ज्येष्ठ उर्दू साहित्यिक नुरूल हसनन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आठ दिवसांपूर्वी अमित शाहांनी माझ्यावर टीका केली. माझ्याबाबत काहीतरी बोललं गेलं. ते म्हणाले की, देशात जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्यांचे सरदार शरद पवार आहेत. आश्चर्याची बाब आहे. गुजरात दंगल झाली होती. त्यावेळी कायद्याचा गैरवापर केला, म्हणून सुप्रीम कोर्टाने अमित शाह याना तडीपार केलं होतं. आज तोच माणूस आपल्या देशाचा गृहमंत्री आहे हे आपलं दुर्दैव,यावरूनच विचार करा कि आज आपला देश कोणत्या दिशेला जात आहे. असं म्हणत पवारांनी अमित शाह यांच्यावर टीका केली तर माझा माझ्या बोटावर पुर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही, असा टोला नरेंद्र मोदींना लगावला.
पवार पुढे म्हणाले, देशाची राज्यघटना बदलण्यासाठी लोकसभेत ४०० जागा पाहिजे असे विधान कर्नाटकच्या भाजपच्या नेत्याने केले होते. नरेंद्र मोदी यांच्या अनेक सहकारी नेते हेच सांगत होते. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी भारतीय राज्यघटना दिली, तिला वाचविण्यासाठी जनतेने भाजपला धडा शिकवला, याचा सर्वाधिक आनंद आहे. जनतेने नेहमीच सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा, देशाची सत्ता हाती असलेले लोक देशाला चुकीच्या मार्गावर नेतील’, असे पवार म्हणाले.