हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठे मागता? असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी मांडल्यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार याना विचारलं असताना त्यांनी प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच उत्तर देत मनोहर भिडे यांची लायकीच काढली. तसेच काहीही प्रश्न विचारता का? असा उलट सवाल पत्रकारांना केला.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांना संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवार चांगलेच भडकले. तसेच संभाजी भिडे हे काही बोलण्याच्या लायकीचे व्यक्ती आहेत का असा प्रतिसवाल त्यांनी केला. प्रश्न पूर्ण होण्याआधीच शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. संभाजी भिडे वगैरे कॉमेंट्स करायच्या लायकीची माणसे आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच तुम्हाला भेटायचे नाही म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारतात. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक, असे सांगत शरद पवार यांनी अधिक बोलणं टाळलं.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते?
काल सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना मनोहर भिडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत म्हंटल कि, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण वाघ सिंहाने मागावे का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे असं भिडे म्हणाले.