तर देशात कायदासुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल : शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | भारतीय अर्थव्यवस्था सध्या मोठ्या अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. भारताचा विकासदर हा गेल्या आठ वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर येऊन पोहोचला आहे. आणि यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भांडवली गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत मंदीतून बाहेर पडणं शक्य नससल्याचं पवार यांनी म्हटलं. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी देशात निर्माण झालेल्या मंदीवर भाष्य केलं.

यावेळी ते म्हणाले कीं, देशात निर्माण झालेल्या मंदीचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे मागील काही दिवसांत अनेक क्षेत्रात कामगारांना कमी करण्याचा सपाटा सुरु झालाय. हे प्रमाण वाढत राहिलं तर अनेकांना रोजगारापासून मुकावे लागणार. पर्यायाने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

सामान्य माणसाची खरेदी करण्याची कुवत वाढत नाही, तोपर्यंत व्यापाराला सुगीचे दिवस लाभणार नाही. पर्यायाने व्यापार आणि उद्योग वाढवल्याशिवाय मंदीतून बाहेर पडणं शक्य होणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत लोकांना कमी करण्यापेक्षा संबंधित उद्योग संस्थांनी स्वतःचा खर्च कमी करून या संकटाला सामोरं जावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या काबाडकष्टामुळे आज देशात शेतमालाची कमतरता नाही. एकेकाळी आयात करणारा भारत देश निर्यातदार बनलाय. मात्र असं असलं तरी सरकारच्या धोरणामुळे अनेकदा संकटं येतात. शेतमालाचे दर वाढले की परदेशातून माल आयात केला जातो, ही बाब शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत निर्यातीला, विक्रीला आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरवर्षी १६ ते १८ हजार शेतकरी आत्महत्या करतांना दिसून येत आहेत. शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, असा एकही दिवस जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्त्या केली की त्याचं घर रस्त्यावर येत. कुटुंबातली संकटं कमी होण्याऐवजी ती वाढतच जातात. त्यामुळे संकटांना धैर्याने तोंड दिलं पाहिजे. खर्च कमी करून, काटकसर करून आणि चुकीच्या गोष्टी टाळून पिकातून दोन पैसे कसे मिळतील याची काळजी घेत या संकटातून बाहेर पडण्याची भूमिका घ्यायला हवी, असा सल्लाही शरद पवार यांनी यावेळी दिला.

Leave a Comment