शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारकीला ‘हे’ शिलेदार लढत देतील

sharad pawar vidhansabha candidate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेला तुतारी दणक्यात वाजली.. तुतारीचा स्ट्राईक रेटही ८० टक्के राहीला.. १० पैकी तब्बल ८ खासदार निवडून आणत शरद पवारांनी दाखवून दिलं आपल्यालाच तेल लावलेला पैलवान का म्हणतात ते… पक्ष गेला, चिन्हाृ गेलं, निष्ठावान गेले … पण नव्या चिन्ह आणि जिद्दीसह पवारांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा नव्यानं सारं काही उभं केलं… लोकसभेला ताकद दाखवून दिल्यानंतर आता वेळ आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची… शरद पवारांनी त्यासाठी विधानसभेच्या तयारीलाही जोर आणलाय… विधानसभेला अवघे काही महिनेच शिल्लक असताना.. जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नसताना शरद पवार गटाच्या १६ मतदारसंघातील उमेदवार कन्फर्म समजले जातायत.. हे सोळा मतदारसंघ आणि तिथून पवारांची तुतारी फुंकणारे ते १६ शिलेदार कोण असतील? त्याचाच हा रिपोर्ट…

यातला पहिला मतदारसंघ येतो तो तासगाव कवठे महाकाळचा… आर. आर. आबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार.. २०१९ ला त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी… शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या या पाटील घराण्ययाकडून सध्या रोहित पाटील यांना उमेदवारी मिळण्याचे फुल चान्सेस आहेत… नगरपंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील य़ांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापीत झालं.. आमदारकीसाठी त्यांची तयारीही झा्लेली असून ते कवठे महांकाळ मधून ते आरामात तुतारी वाजवतील असं बोललं जातंय..दुसरा मतदारसंघ आहे नगर श्रीगोंदा… भाजपचे बबनराव पाचपुते हे इथले सध्याचे आमदार.. प्रस्थापीत असणाऱ्या पाचपुतेंना इथून राष्ट्रवादीचे राहुल जगताप फाईट देत असतात.. २०१४ ला जगताप, २०१९ ला पाचपुते अशी आलटून पालटून नगर श्रीगोंदाच्या जनतेनं आमदार बदलल्याने यंदा तुतारीच्या चिन्हावर राहुल जगताप आमदार होतील असा अंदाज आहे. पण पाचपुते इथून यंदाही तगडं आव्हान उभं करतील यात शंका नाही..

तिसरा मतदारसंघ आहे पाथर्डी शेवगाव…… शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून लढत देतील प्रतापकाका ढाकणे. खरं म्हणजे भाजपच्या मोनिका राजळे मोदीलाटेत २०१४ ला निवडून आल्या ते त्यांनी परत माघारी वळून कधीच बघीतलं नाही.. पण यंदा निष्ठावान प्रतापकाका ढाकणे यांच्या पाठिशी शरद पवारांनी ताकद लावली तर जातीय समीकरणं, सहानुभुतीची लाट हे फॅक्टर महत्वाचे ठरुन ढाकणे पार्थडीतून तुतारी वाजवतील हे नक्की..चौथा मतदारंसघ येतो तो बारामतीचा…राष्ट्रवादीची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात अजितदादांचा शब्द अंतिम चालतो. पण पक्षफुटीनंतर आता शरद पवार इथून युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करतायत… त्यात अजितदादांच्याच मतदारसंघात तुतारीला ४५ हजारांचं लीड मिळाल्यानं युगेेंद्र पवारांच्या आमदारकीच्या महत्वकांक्षा चांगल्याच वाढल्यात.. त्यामुळे समोर बिग बॉस दादा असताना युगेंद्र पवार इथून तुतारी वाजवतील का, हे पाहणं इंटरेस्टींग असणारय..

पाचवा मतदारसंघ आहे नगर – राहुरी… 2019 च्या विधानसभेला भाजपच्या शिवाजीराव कर्डीलेंसारख्या मातब्बर नेत्याला आसमान दाखवत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे जायंट किलर ठरेल… त्यात राष्ट्रवादीतील फुटीत ते शरद पवारांशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांनी लोकसभेलाही लंकेंना विजयातील महत्वाचा हात दिला. त्यामुळे तनपुरेच इथून तुतारी वाजवतील, असं सध्या मतदारसंघातलं जनमत आहे..सहावा मतदारसंघ येतो तो पारनेरचा… पहिल्याच टर्ममध्ये आमदार आणि खासदार झालेले निलेश लंके यांचा हा विधानसभा मतदारसंघ.. दादांचा विश्वासू माणूस म्हणून ओळख असणारे लंके साहेबांसोबत आले आणि खासदार झाले.. त्यामुळे आता मोकळ्या झालेल्या या जागेतून तुतारीकडून पारनेरचा उमेदवार कोण? हा मोठा प्रश्न शरद पवारांसमोर असणारय.. पण त्याला एक उत्तर असू शकतं ते म्हणजे राणी लंके यांचं… राणी लंके लोक प्रतिनीधी बनण्यासाठी इच्छुक आहेत… आणि दुसरीकडे पक्षाकडे पारनेरमधून म्हणावा असा आमदारकीसाठी चेहरा नसल्याने राणी लंकेच इथून तुतारी फुंकतील…

सातवा मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा..रोहित पवार इथले विद्यमान आमदार.. कॅबिनेट मंत्री राहिलेल्या आणि शरद पवारांच्या अत्यांत जवळच्या समजल्या जाणाऱ्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहितदादा आमदार झाले.. त्यानंतर त्यांनी संघर्ष यात्रा, एमआयडीसीचा प्रश्न आणि विविध सामाजिक प्रश्वांवरुन विधीमडळ गाजवलं.. त्यामुळे रोहित पवार हे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे तर कन्फर्म आहेच.. पण त्यांना राम शिंदे यंदा कसं आव्हान देतील, हे पहावं लागेल…आठवा मतदारसंघ येतो तो शिरुरचा..शिरुरच्या पट्ट्यातून सगळे अजितदादांच्या पाठिशी गेले उरले फक्त निष्ठावान शिरुरचे आमदार अशोक पवार.. त्यामुळे यंदाही तेच राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसतील, यात शंका नाही.. भाजपच्या बाबुराव पाचुर्णेंविरोधात ते परंपरागत लढत देतील.. शिरुरुनं खासदारकीला तुतारीला कौल दिला आहेच, आता आमदारकीला काय होईल, हे पाहणं महत्वाचं ठरेल..

नववा मतदारसंघ येतो काटोळचा.. महाविकास आघाडीत सर्वाधिक जास्त चर्चेत राहिलेले अनिल देशमुख याच काटोळचं विधीमंडळात प्रतिनीधीत्व करतात… राष्ट्रवादीची दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांची फळी अजितदादांसोबत गेलेली असताना काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नाव साहेबांसोबत थांबली.. त्यापैकीच एक अनिल देशमुख.. काटोळ हा देशमुखांचा बालेकिल्ला असल्याने ते इथून तुतारी आरामात वाजवतील, असा सध्या ट्रेंड दिसतोय..दहावा मतदारसंघ आहे मुंब्रा … पवारांच्या राष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्र वगळता मुंबईच्या ज्या कुठल्या पट्ट्यावर प्रभाव राहीला असेल तर तो मुंब्राच्या.. जितेंद्र आव्हाड इथले फायरब्रँड आमदार.. शरद पवारांच्या पाठीशी नेहमीच सावलीप्रमाणे उभे असणारे आव्हाड इथून सलग अनेक टर्म इथून निवडून जातायत.. मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्यांक बहुल सामाजावर आव्हाडांची असणारी पकड पाहता मुंब्रा कळव्याला तुतारीचा आवाज ऐकायला मिळेलच, हे निश्चित…

अकरावा मतदारसंघ येतो तो इस्लामपुरचा…… राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा हा मतदारसंघ. त्यामुळे स्वाभाविकपणे यंदाही तेच इथून तुतारीचे उमेदवार असतील… तब्बल तीन दशकं ते आमदार असल्याने त्यांच्या जिंकण्या हारण्याची चर्चा आपण न केलेलीच बरी…बारावा मतदारसंघ आहे बीडचा…बजरंग बाप्पांच्या विजयासाठी बीडात ज्यांनी फिल्डींग लावली होती ते संदीप क्षीरसागर हे या मतदारसंघाचे पहिल्या टर्मचे आमदार.. आपल्याच काकाला म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना मात देत संदीप हे विधीमंडळात गेले. पक्षातील आपली पोजिशनही स्ट्रोंग बनवली. यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेला संदीप क्षीरसागर यांना तगडा विरोधकच नसल्याने त्यांचा विजय जवळजवळ निश्चित समजला जातोय…

तेरावा मतदारसंघ आहे घनसावंगीचा… पवार साहेबांसोबतच निष्ठा दाखवणाऱ्या काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकीच एक असणारे राजेश टोपे या मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करतात. शांत, सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यात कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्रीपद मोठ्या धाडसानं पेलल्यामुळे त्यांची उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला टोपे तुतारीच्या चिन्हावर विधीमंडळात येतील, यात शंका नाही….. चौदावा विधानसभा मतदारसंघ आहे विक्रमगड… सुनिल भुसारा हे इथले विद्यमान आमदार.. भाजपचा बालेकिल्ला भुसारा यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदाच ताब्यात घेतला.. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांनाच विक्रमगडची उमेदवारी निश्चित आहे. फक्त भाजपने इथं ताकद लावली तर ही जागा अटीतटीची होऊ शकते…

पंधरावा मतदारसंघ आहे अकोले…अकोल्यातील विधानसभा ही अटीतटीची असते.. कारण जागा एक आणि उमेदवार फार अशी इथली परिस्थिती.. राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे इथले विद्यमान आमदार.. हे सध्या अजितदादा गटासोबत असल्याने त्यांचे राजकीय पंख झाटण्यासाठी शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांना उमेदवारी मिळण्याचे फुस चान्सेेस आहेत…आता बोलूयात शेवटच्या सोळाव्या नगर शहर मतदारसंघाबद्धल …. अजित पवार गटात गेलेले दोन टर्म निवडून आलेले संग्राम जगताप हे इथले विद्यमान आमदार… जगतापांना मात देण्यासाठी इथे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.. पण इथली लढत अटीतटीची होणार असून जिंकणारा घासून पण ठासून येईल एवढं मात्र निश्चित..तर हे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संभाव्य १६ उमेदवार.. बाकी या १६ उमेदवारांपैकी कोण आमदार होईल आणि कुणासाठी घोडेमैदान लांब आहे? ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.