कराड | रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भगिनी व शे.का.प.चे नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील (सर) यांच्या पत्नी व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई) यांनी काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी माईंनी संपूर्ण नूतन इमारत फिरून पाहिली व कामाचे कौतुक केले.
यावेळी सरोज पाटील म्हणाल्या, बऱ्याच दिवसापासून पेपरच्या माध्यमातून तसेच अनेक लोकांनी शाळेच्या नूतन इमारती विषयी माहिती दिली होती. त्यामुळे नूतन इमारत पाहण्याची उत्सुकता होती. तो योग आज घडून आला. नूतन इमारत पाहून खूप आनंद झाला. ग्रामस्थांनी जे शाळेसाठी जे भरभरून योगदान दिले आहे, ते खूप कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळेमध्ये विविध उपक्रम राबवावे. प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थी हे देव व शाळा हेच मंदिर ही भावना ठेवून आपले कर्तव्य बजावावे.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. नलवडे यांनी माईंचे स्वागत केले. स्कूल कमिटी सदस्य विकास पाटील व सौरभ कुलकर्णी यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. माईंना गुळाची ढेप व काकवी भेट देऊन सदिच्छा भेटीबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले. यावेळी दिपक पाटील- ढवळी, इतिहास संशोधक के. एन. देसाई (सर) शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.