कराड | तालुक्यातील ओंड आरोग्य उपकेंद्र गेल्या दोन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना काळात उपचारा अभावी लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील रिक्त पदे भरणार नसाल तर आरोग्य उपकेंद्र बंद करा. अन्यथा, याप्रश्नी आम्ही उपोषणास बसू, असा इशारा पंचायत समिती सदस्य शरद पोळ यांनी दिला.
येथील दैत्यनिवारिणी मंदिरानजीक असलेल्या पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी 17 रोजी पंचायत समितीची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेदरम्यान, आरोग्य विभागाकडून आढावा सादर करण्यात आला. यावेळी ओंड आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदाचा मुद्दा उपस्थित करताना ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रणव ताटे होते. यावेळी उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
शरद पोळ म्हणाले, येवती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 39 गावे असून 6 उपकेंद्रे आहेत. मात्र, येथील किती जागा रिक्त आहेत, याचा पाठपुरावा करावा. ओंड उपकेंद्रात आरोग्य अधिकारी, कर्मचारी नसल्याने कोरोनासारख्या परिस्थितीतही दोन वर्षांपासून लोकांचे हाल सुरु आहेत. त्यामुळे येथील रक्त पदे भरण्याबाबत वारंवार मागणी करण्यात आली होती. तसेच गत पं. स. सभेत याप्रश्नी ठोस उपाययोजना करण्याबाबत आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, तो प्रश्न अद्यापही प्रलंबितच असून एकतर सदर उपकेंद्र बंद करा, अन्यथा ते पाडून टाका. त्याची आम्हाला गरज नाही, असे खडे बोल त्यांनी यावेळी सुनावले.
यावर सभापती ताटे यांनी याप्रश्नी आपण जिल्हा परिषदेत पाठपुरावा केला असून पालकमंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला असल्याचे सांगितले. त्यावर पाठपुरावा व पत्रव्यवहार केल्याबद्धल तुमचे मी आभार मानतो. परंतु, सदर प्रश्न मार्गी न लागल्यास वेळप्रसंगी आपण उपोषणास बसू, असा इशारा पोळ यांनी दिला. त्यांनतर उपसभापती देशमुख यांनी तालुक्यात ज्याठिकाणी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे, तेथील मनुष्यबळ आवश्यक ठिकाणी देऊन कर्मचाऱ्यांचे समानीकरण करण्यात यावे, असे मत व्यक्त केले. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी याप्रश्नी अधिक माहिती घेऊन आपल्या अधिकारात जर कर्मचाऱ्यांचे समानीकरण करता येत असल्यास तसे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.