सातारा | सातारा जिल्ह्यातील खटाव, कराड, महाबळेश्वर पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. कराड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी वाळवा पंचायत समितीचे शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. तर कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार यांची बदली वाळवा पंचायत समितीत झाली आहे.
या अधिकाऱ्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही प्रशासनाने केल्या आहेत. बदलीचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव डॉ. वसंत माने यांनी काढला आहे. वडूज, (ता. खटाव) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश काळे यांची जावली पंचायत समितीच्या -गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांची वाई पंचायत समिती येथे बदली झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अरुण मरभळ यांची महाबळेश्वर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.